मुंबई– कांदिवली, चारकोप येथील हौसिंग सोसायटीतील अनधिकृत धार्मिक स्थळ एक महिन्यात हटवले जाईल, असे आश्वासन गृहनिर्माण राज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी आज विधानसभेत दिले. ‘एमआरटीपी’ अंतर्गत गुन्हा दाखल करण्याच्या सूचना म्हाडाच्या क्षेत्रीय अधिकाऱ्यांना दिल्या जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
भाजपा आमदार योगेश सागर यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचना मांडत चारकोपच्या हौसिंग सोसायटीत अनधिकृत मशिदीबाबत प्रश्न उपस्थित केला. चारकोप सेक्टर १ मधील प्लॉट नं. १४५ वर ‘नशेमन सहकारी गृहनिर्माण संस्था’ या म्हाडाच्या निवासी वास्तूत तीन घरे एकत्र करून मशिदीमध्ये रूपांतर करण्यात आले, अशी माहिती त्यांनी दिली. यासाठी कोणतीही अधिकृत परवानगी घेतलेली नाही, त्यामुळे धार्मिक तेढ निर्माण करण्याचा हा प्रयत्न असल्याचा आरोप त्यांनी केला.
मंत्री शंभुराज देसाई यांनी खुलासा करताना सांगितले की, संबंधित सोसायटीत ३५ बैठ्या खोल्या असून, १४, १५ आणि १६ क्रमांकाच्या खोल्यांचा वापर करून अनधिकृत प्रार्थनास्थळ निर्माण करण्यात आले आहे. म्हाडाने १८ मार्च रोजी नोटीस पाठवली असतानाही कोणीही सुनावणीसाठी हजर राहिले नाही, तसेच लेखी म्हणणेही सादर केले नाही, असे त्यांनी सांगितले.
राज्य सरकारकडून या प्रकरणाची गंभीर दखल घेत एका महिन्यात अतिक्रमण कारवाई केली जाईल, असे मंत्री देसाई यांनी स्पष्ट केले.