Twitter : @NalavadeAnant
मुंबई
अडीच वर्षे मुख्यमंत्री असताना मराठा आरक्षणासाठी काहीही न करणारे उद्धव ठाकरे सध्या आरक्षण विषयावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर पातळी सोडून टीका करत आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टीकेला आपण स्वतः त्याच भाषेत उत्तर देऊ, असा इशारा केंद्रीय सूक्ष्म,लघु व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी गुरूवारी प्रदेश भाजप कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना दिला.
घटनेतील तरतुदींनुसार सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक मागासलेपण सिद्ध करून मराठा समाजाला फडणवीस सरकारप्रमाणे १६ टक्के स्वतंत्र आरक्षण देणे योग्य ठरेल, असेही राणे यांनी यावेळी नमूद केले.
राणे म्हणाले की, सरसकट सर्व मराठा समाजाला कुणबी दाखले न देता घटनेच्या १५(४) व १६(४) कलमांचा अभ्यास करून आरक्षणाबाबत निर्णय घेण्यात यावा. सरसकट कुणबी दाखला द्या ही ९६ कुळी मराठ्यांची मागणी नाही. महाराष्ट्रात ३८ टक्के मराठा समाज अत्यंत गरीब आहे. आर्थिक स्थितीअभावी शिक्षणापासून वंचित राहणाऱ्यांना आरक्षण देणे गरजेचे आहे. मराठा आरक्षणाची मागणी जोर धरू लागल्याने या समाजाबद्दल द्वेषाची भावना बळावता कामा नये, तसेच कोणत्याही समाजाचे आरक्षण काढून दुसऱ्याला देणे हे गैर असल्याचेही राणे यांनी स्पष्ट केले.
स्वत: अडीच वर्षे मुख्यमंत्री असताना अडीच दिवसही मंत्रालयात न जाणाऱ्या उद्धव ठाकरेंना, मराठा समाजाला आरक्षण देण्यात त्यावेळी काही रस नव्हता. तसेच तत्कालिन आघाडी सरकार मराठा आरक्षणाबाबत अत्यंत निष्क्रीय होते, असा आरोपही राणे यांनी केला.
उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर पातळी सोडून केलेल्या टीकेचा तसेच जी-२० परिषदेवर केलेल्या टीकेचाही राणे यांनी खरपूस समाचार घेतला. लोककल्याणासाठी मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस अहोरात्र झटत असताना उद्धव ठाकरे हे सत्ता गेल्यामुळे आलेल्या वैफल्यातून पातळी सोडून टीका करीत असल्याचेही राणे यांनी यावेळी नमूद केले.