दिव्यांगांसाठी मुंबई मेट्रो प्रवास 100% मोफत करण्याची मुख्यमंत्री फडणवीस यांना मागणी
मुंबई : मुंबई मेट्रोमध्ये दिव्यांग प्रवाशांना सध्या केवळ २५ टक्के सवलत दिली जाते. मात्र वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर हा प्रवास खर्च दिव्यांगांसाठी मोठा आर्थिक ताण ठरत असल्याचे लक्षात घेऊन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी या मुद्द्यात थेट हस्तक्षेप केला आहे. वरिष्ठ पत्रकार आणि दिव्यांग कार्यकर्ते दिपक कैतके यांनी मांडलेल्या मागणीला समर्थन देत आठवले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मेट्रो प्रवास १००% मोफत करण्याबाबत अधिकृत पत्र पाठविले आहे.
आठवले यांनी पत्रात नमूद केले आहे की, दिव्यांग प्रवाशांचे उत्पन्न मर्यादित असते आणि रोजच्या प्रवासासाठी मेट्रो हा सर्वात सुरक्षित, सुटसुटीत आणि वेळेवर पोहोचणारा पर्याय आहे. त्यामुळे त्यांना संपूर्णपणे मोफत प्रवास सुविधा देणे अत्यावश्यक आहे. राज्य सरकारने दिव्यांगांसाठी अनेक योजना राबवल्या असल्या तरी मेट्रो प्रवास मोफत करण्याचा निर्णय त्यांच्या दैनंदिन जीवनात मोठा दिलासा देणारा ठरेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
मंत्री आठवले यांच्या या हस्तक्षेपामुळे आता राज्य सरकारचे लक्ष या मागणीवर वेगाने केंद्रित होण्याची शक्यता आहे. वरिष्ठ पत्रकार दिपक कैतके हे दिव्यांगांच्या न्यायहक्कांसाठी सातत्याने लढा देत असून, मेट्रोमधील सवलत वाढवण्याची मागणी त्यांनी काही दिवसांपासून सतत पुढे मांडली होती. मुंबईसह महानगरातील वाढत्या मेट्रो नेटवर्कमुळे हजारो दिव्यांग प्रवाशांना रोजच्या प्रवासाचा खर्च पेलणे अवघड जाते. त्यामुळे १००% सवलत ही त्यांच्यासाठी मोठी मदत ठरेल, असे आठवले यांनी म्हटले आहे.
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची धामधूम सुरू असताना केंद्र सरकारकडून मिळालेला हा जोरदार पाठिंबा महत्त्वाचा ठरत आहे. आता मुख्यमंत्री फडणवीस या मागणीवर किती लवकर निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

