नागपूर: महाराष्ट्राला सर्व आघाड्यांवर क्रमांक एकचे राज्य करताना विकसित भारतासाठी महाराष्ट्राची भक्कम जोड द्यायची आहे. गेल्या अडीच वर्षांत महाराष्ट्राच्या कायापालटाला सुरुवात झाली असून, आता आमचे एकत्रित मिशन समृद्ध महाराष्ट्र आहे. आम्ही आता तिप्पट वेगाने महाराष्ट्राला विकासाच्या मार्गावर नेऊ. महाराष्ट्र आता थांबणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानपरिषदेत दिली.
राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना उपमुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, “गेल्या अडीच वर्षांत महायुतीने विकास आणि कल्याणकारी योजनांमध्ये ऐतिहासिक कामगिरी केली. विक्रमी कामे झाली असून एकही दिवस सुट्टी न घेता आम्ही काम केले. त्यामुळे राज्याच्या निवडणुकीच्या निकालांत इतिहास घडला.”
अधिक गतिमान आणि लोकाभिमुख कारभाराचे वचन
“गेल्या अडीच वर्षांत आम्ही एक टीम म्हणून काम केले. त्यामुळेच आमचे सरकार हे जनतेचे लाडके सरकार बनले. जनतेच्या विश्वासामुळे आमची जबाबदारी वाढली आहे. आता अधिक गतिमान आणि लोकाभिमुख कारभाराचे वचन आम्ही देतो. मुख्यमंत्री म्हणून काम करताना गतिमान विकास हेच धोरण ठेवले. पक्षभेद आणि द्वेषाला कधीही थारा दिला नाही. माझ्यावर टीका झाली, परंतु त्याला मी कामातूनच उत्तर दिले,” असेही त्यांनी सांगितले.
विकासकामांचा स्ट्राईक रेट वाढतच राहणार
“गेल्या अडीच वर्षांत महायुती सरकारच्या विकासकामांचा स्ट्राईक रेट देशात सर्वाधिक होता. यापुढे तो अधिक वाढतच राहील. महाराष्ट्राला देशात क्रमांक एकचे राज्य बनविण्यासाठी आम्ही दिवसरात्र काम करत होतो आणि पुढेही करू,” अशी ग्वाहीही उपमुख्यमंत्र्यांनी दिली.
विदर्भ विकासासाठी ठोस पावले
श्री. शिंदे म्हणाले, “माझे विदर्भाशी खास नाते आहे, कारण इथल्या प्रेमळ जनतेने नेहमी पाठिंबा दिला. मुख्यमंत्री असताना विदर्भासाठी भरीव काम करण्याची संधी मिळाली याचा आनंद आहे. समृद्धी महामार्ग गोंदिया, भंडारा, गडचिरोलीपर्यंत विस्तारला जात आहे. विदर्भातील ५ लाख शेतकऱ्यांना धानासाठी हेक्टरी १५ हजार रुपये बोनस देण्याची घोषणा मी केली होती, ती आता २० हजार रुपये केली आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातील औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी ७० हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांना मंजुरी दिली आहे.”
अग्रसर महाराष्ट्र…
“गेल्या अडीच वर्षांत महिलांसाठी महिला सक्षमीकरण योजना, शेतकऱ्यांसाठी मोफत वीज, आरोग्य विमा योजना अशा अनेक लोककल्याणकारी योजना राबवून महाराष्ट्राने देशात आपला ठसा उमटवला आहे. राज्यातील पायाभूत सुविधांच्या १० लाख कोटी रुपयांच्या कामांचा मोठा प्रकल्प सुरु आहे,” असेही त्यांनी नमूद केले.
महिला, ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष योजना
“‘माझी लाडकी बहीण’ योजनेंतर्गत २ कोटी ३४ लाख महिलांना पाच हप्ते दिले गेले असून, हे हप्ते यापुढेही सुरू राहतील. ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत एसटी प्रवास, तीर्थयात्रा योजना, वयोश्री योजना अशा विविध योजना राबविल्या जात आहेत,” असेही त्यांनी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आखलेल्या महासत्तेच्या रोडमॅपप्रमाणे महाराष्ट्राला विकसित भारतासाठी भक्कम जोड द्यायची आहे. “आमचं एकत्रित मिशन समृद्ध महाराष्ट्र असून, आम्ही महाराष्ट्राला तिप्पट वेगाने विकासाच्या मार्गावर नेऊ,” अशी ग्वाही उपमुख्यमंत्र्यांनी दिली.