मुंबई – अमेरिकेने वस्त्रोद्योगावर ५०% टॅरिफ लावल्याने भारतीय कापड निर्यातीत मोठा फटका बसला असून, भिवंडी पूर्वचे समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून पॉवरलूम उद्योगावरील परिणाम कमी करण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
आमदार शेख यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात सरकारने टॅरिफचा परिणाम अभ्यासण्यासाठी समिती स्थापन करण्याच्या निर्णयाचे स्वागत केले. मात्र त्यांनी इशारा दिला की, “भारताच्या कापड निर्यातीतील ६०% योगदान पॉवरलूम क्षेत्रातून येते. भारतातील एकूण कापड उत्पादनापैकी जवळपास ५८.४% पॉवरलूममधून होते. वाढते खर्च, स्पर्धात्मकतेतील घट आणि निर्यात ऑर्डर कमी झाल्याने या उद्योगावर अस्तित्वाचा प्रश्न उभा राहिला आहे. वेळेत हस्तक्षेप न केल्यास हजारो कुटुंबे संकटात सापडतील.”
शेख यांनी पुढे म्हटले की, “अमेरिकेच्या टॅरिफमुळे परिस्थिती आणखी गंभीर होणार आहे. निर्यात घटल्यास प्रमुख युनिट्स बंद होण्याची शक्यता असून, मोठ्या प्रमाणावर रोजगार गमावले जाऊ शकतात. सरकारने त्वरित स्पष्ट कृती आराखडा सादर करून रोजगार वाचवला पाहिजे आणि या महत्त्वाच्या क्षेत्राची शाश्वतता सुनिश्चित केली पाहिजे.”
महत्त्वाचे आकडे :
• महाराष्ट्र भारताच्या वस्त्रोद्योग उत्पादनात 10.4% आणि रोजगारात 10.2% वाटा देतो.
• राज्यात दरवर्षी सुमारे २७२ दशलक्ष किलो सूत तयार होते (राष्ट्रीय उत्पादनाच्या १२%).
• भारतातील निर्यात कापडांपैकी ६०% उत्पादन करणारे पॉवरलूम्स मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात केंद्रित.
• राज्यात सुमारे १२.७ लाख पॉवरलूम्स असून, जवळजवळ ३० लाख लोकांच्या उपजीविकेचा आधार.