मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली असताना आता सोलापूर लोकसभा मतदारसंघात (Solapur Lok_Sabha constituency) नवा ट्विस्ट आला आहे . या मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीने (Vanchit Bahujan Aaghadi )माघार घेतली आहे . या मतदारसंघातून राहुल गायकवाड यांना उमेदवारी दिली होती . मात्र त्यांनी या मतदारसंघात वंचितला पाठींबा मिळणार नसल्याच लक्षात आल्यानंतर माघार घेतली . या माघातीनंतर वंचित बहुजन आघाडीच्या राज्य कार्यकारिणीने आता सोलापूर लोकसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार आतिश मोहन बनसोडे (AATISH MOHAN BANSODE.)यांना पक्षाचा पूर्ण पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती आपल्या ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे .त्यामुळे त्यांच्या या खेळीने काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांचं टेन्शन वाढणार आहे .
याआधी 2019 च्या लोकसभेत सोलापूरमधून वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर रिंगणात होते. प्रकाश आंबेडकर यांना सोलापुरातून 1 लाख 70 हजार मतं मिळाली होती, तर काँग्रेसकडून सुशीलकुमार शिंदे यांना 3 लाख 66 हजार 377 मतं मिळाली. भाजपचे जयसिद्धेश्वर स्वामी 5 लाख 24 हजार 985 घेऊन सोलापुरातून विजयी झाले. दरम्यान 2024 च्या निवडणुकीत वंचितने माघार घेतल्यामुळे आता भाजप विरुद्ध काँग्रेस असा थेट सामना होणार आहे. या मतदारसंघात वंचितने अपक्ष उमेदवाराला पाठींबा दिला असला तरी प्रमुख लढत काँग्रेस उमेदवार प्रणिती शिंदे विरुद्ध भाजप उमेदवार राम सातपुते यांच्यात होणार असल्याचे चित्र आहे. दरम्यान वंचितने अपक्ष उमेदवाराला पाठींबा दिल्याने वंचितची किती मते त्याच्याकडे वळणार हा देखील उत्सुकतेचा विषय असणार आहे.
या मतदारसंघात एकीकडे वंचितची माघार आणि दुसरीकडे सोलापूर जिल्ह्यात प्रभाव असलेले मोहिते पाटील आता शरद पवारांसोबत आल्यामुळे याचा प्रणिती शिंदेंना फायदा होणार का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. 7 मे रोजी होणाऱ्या तिसऱ्या टप्प्याच्या निवडणुकीत सोलापुरात मतदान होणार आहे. त्यामुळे या मतदारसंघात कोणाची बाजी लागणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे .