मुंबई : लोकसभेच्या निकालानंतर आता विधानसभा (Vidhansabha) निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली आहे. त्याच धर्तीवर पक्षांमध्ये राजकीय नेत्यांचे इनकमिंग आणि आऊटगोईंगही होण्याच्या शक्यता आहेत . याच पार्शवभूमीवर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) ते वंचित बहुजन आघाडी (VBA) असा प्रवास करणारे पुण्याचे वसंत मोरे (Vasant More) हे आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Shiv Sena UBT) गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चाना उधाण आलं आहे. आज वसंत मोरे माजी मुख्यमंत्री आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची मातोश्रीवर दुपारी साडेबारा वाजता भेट घेणार असल्याची माहिती समोर आली आहे .
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत वसंत मोरे यांनी प्रकाश आंबडेकर यांच्या वंचित बहुजन आघाडीत प्रवेश करुन तिकीट मिळवलं. पण त्यांना लोकसभा निवडणुकीत पराभव पत्करावा लागला . पुणे लोकसभेतून भाजपचे मुरलीधर मोहळ यांचा विजय झाला. वंचितचे उमेदवार वसंत मोरे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांना पराभवाचा सामना करावा लागला.त्यानंतर ते आता आगामी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी रिंगणात उतरणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात होत आहेत. दरम्यान विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने ते आज मातोश्रीवर जाणार आहेत. त्यांच्यासोबत खासदार संजय राऊत (Sanjay Raut )आणि शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते साजन पाचपुते हेसुद्धा मातोश्रीवर उद्धव ठाकरेंना भेटण्यासाठी येणार आहेत. त्यामुळे आता मातोश्रीवर काय खलबत होते हे पाहणे जास्त महत्वाचे ठरणार आहे.
दरम्यान याआधी लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस सुद्धा आपल्याला उमेदवारी मिळावी यासाठी वसंत मोरे यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांची भेट घेतली होती. मात्र काँग्रेसने महाविकास आघाडीमध्ये उमेदवार दिल्याने वसंत मोरे यांना उमेदवारी मिळू शकली नाही. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीकडून त्यांनी लोकसभा निवडणूक लढवली होती. आगामी विधानसभा निवडणुकीचा विचार करता वसंत मोरे शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करण्याची शक्यता आहे