मुंबई : नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मिळालेल्या यशानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट (Shivsena Uddhav Thackeray Group) आता विधानसभा (Vidhanparishad Election 2024) निवडणुकीच्या तयारीला लागला आहे. अशातच आज पुण्यातील माजी नगरसेवक आणि काँग्रेस नेते वसंत मोरे (Vasant More) यांनी मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरें यांची (Uddhav Thackeray) भेट घेतली. या भेटीत त्यांच्यात आगामी विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने चर्चा झाली असून पुढील आठवड्यात 9 जुलैला वसंत मोरे ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता ठाकरेंची मशाल घेऊनच वसंत मोरे विधानसभेच्या रिंगणात उतरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी लोकसभा निवडणुकांपूर्वीच वसंत मोरेंना फोन करुन शिवसेनेत येण्याची ऑफर दिली होती. मात्र त्यांनी प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडी प्रवेश करून तिकीट मिळवले पण त्यांना लोकसभा निवडणुकीत पराभव पत्करावा लागला. दरम्यान आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवत वसंत मोरे यांनी ठाकरे गटात प्रवेश केल्याच्या चर्चांना आता उधाण आल आहे.
याआधी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्याबद्दल नाराजी नसून वरिष्ठाकडून होत असलेल्या दुर्लक्षितपणामुळे आपण मनसेला रामराम करत असल्यास वसंत मोरे यांनी सांगितलं होतं. मात्र लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर आता ते विधानसभेच्या रिंगणात उतरणार आहेत. वसंत मोरे हे खडकवासला किंवा हडपसर मतदारसंघातून विधानसभा लढवणार असल्याची माहिती देखील समोर आली आहे.
ठाकरे गटातील पक्षप्रवेशावर बोलताना वसंत मोरे यांनी मी वंचितमधून लोकसभा निवडणूक लढलो पण वंचित मतदारांनी मला स्वीकारलं नाही त्यामुळे मी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याचे सांगितलं.