मुंबई : नुकत्याच सुरु झालेल्या राज्य विधीमंडळाच्या (Maharashtra Legislative Assembly Session) पावसाळी अधिवेशनात विरोधक विविध मुद्यावरून सरकारला धारेवर धरत आहेत. दरम्यान या अधिवेशनात विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी सभागृहात भारतीय जनता पक्षाचे आमदार प्रसाद लाड यांना शिवीगाळ केली होती. त्यानंतर त्यांच्यावर कारवाई करत त्यांचं पाच दिवसांसाठी निलंबन करण्यात आलं होतं. मात्र आज त्यावर फेरविचार करण्यात आला असून त्यांच्या निलंबनाचा कालावधी 5 दिवसांवरून 3 दिवस करण्यात आला आहे. त्यामुळे उद्यापासुन ते सभागृहाच्या कामकाजात सहभागी होऊ शकणार आहेत.
दरम्यान उपसभापती नीलम गोरे यांना अंबादास दानवे यांनी निलंबनानंतर पत्र पाठवलं. या पत्रातून त्यांनी दिलगिरी व्यक्त केली. तसेच या पत्रात त्यांनी सभागृहाचे कामकाज सुरु आहे, या स्थितीत महाराष्ट्रातील शेतकरी, कष्टकरी, तरुण व माता- भगिणींचे अनेक प्रश्न मला सभागृहात मांडायचे आहेत. जेणेकरुन सरकार त्या प्रश्नाला न्याय देईल, त्यामुळे माझे निलंबन म्हणजे शेतकरी, कष्टकरी, तरुण व माता-भगिणीचे प्रश्न सोडविण्यापासून मला थांबविणे असे होवू नये. या हेतूने माझ्या निलंबनाचा फेरविचार करावा अशी विनंती दानवे यांनी केली होती.याचा एकमताने ठराव मंजूर झाल्यानंतर अंबादास दानवे यांच्यावरील कारवाई सभापतींकडून मागे घेण्यात आली आहे.
दरम्यान सभागृहात केलेल्या माझ्या वक्तव्यासंदर्भात आमच्या पक्षप्रमुखांनी जाहिरपणे दिलगीरी व्यक्त केली आहे,हे आपण जाणताच आणि माझीही भुमिका सभागृहाचे पावित्र्य कायम राहावे हीच आहे, असेही अंबादास दानवे यांनी त्या पत्रात म्हटलं आहे. आता निलंबनाचा कालावधी कमी झाल्यानंतर उद्यापासूनचं ते विधानपरिषदेच्या सभागृहात दिसणार आहेत.