महाराष्ट्र ताज्या बातम्या

शरद पवार राक्षस तर अजितदादा ब्रम्हराक्षस,बारा तारखेला फॉर्मभरून यांचे बारा वाजवणार

विजय शिवतारेंचा हल्लाबोल

@ajaaysaroj

बारामतीचा रणसंग्राम आता अंतिम टप्प्यात आला आहे. विजय शिवतारे यांनी बारामतीतून बारा तारखेला फॉर्म भरून पवार कुटुंबाच्या दहशतवादाचे बारा वाजवणारच असा निर्धार व्यक्त केला आहे. शरद पवार हे राक्षस आहेत तर अजितदादा हे ब्रम्हराक्षस असून एका राक्षसाला मारण्यासाठी दुसरा राक्षस मोठा करू नका असे आवाहन राज्यातील जनतेसह महायुतीच्या नेत्यांना केले आहे.

महायुतीच्या नेत्यांनी सांगितले तर मी कमळ चिन्हावर पण लढायला तयार असून संपूर्ण राज्याला वेठीस धरणाऱ्या पवार कुटुंबाच्या पाशवी शक्तीचे बारा वाजवणारच असा हल्लाबोल विजयबापूंनी केला आहे. शरद पवार आणि त्यांच्या कुटुंबियांनी ग्रामीण महाराष्ट्रात सर्व ठिकाणी कब्जा केला असून हा एक प्रकारचा रुरल टेरारिझम , ग्रामीण दहशतवाद आहे. याचा उगम शरद पवारांनी केला असून त्याचेच पुढचे रूप अजित पवार आहेत असे त्यांनी स्पष्ट केले. संग्राम थोपटे यांचा कारखाना याच दहशतवादी मानसिकतेने बंद पाडला , गुंजवणी प्रकल्पाचा निधी याच एकाधिकारशाही प्रवृत्तीच्या पवारांनी रोखून धरला अशी अनेक उदाहरणे देत या झुंडशाहीला विरोध करण्यासाठी आपण निवडणूक रिंगणात उतरत असल्याचे ठासून सांगितले. या बारामती लोकसभा मतदारसंघात पवार कुटुंबाच्या विरोधात तब्बल पावणेसहा लाख मतदार आहेत , त्यांच्या मताचा आदर ठेवणारा हक्काचा उमेदवार म्हणून , जनसामान्य आपल्याकडे बघत आहे. पवार कुटुंबातील दहशतवादाला पर्याय म्हणून आपली उमेदवारी असेल याचा पुनरोच्चार बापूंनी केला.

या लोकसभा मतदारसंघात बारामती, दौंड, पुरंदर, खडकवासला, इंदापूर आणि भोर असे सहा विधानसभा मतदारसंघ येतात. दौंड चे राहुल कुल आणि खडकवासलाचे भीमराव तापकीर असे दोन आमदार सध्या भाजपकडे आहेत. पुरंदरचे संजय जगताप व भोरचे संग्राम थोपटे हे काँग्रेसचे आहेत तर इंदापूर मधील दत्तात्रय भरणे आणि बारामतीचे खुद्द अजित पवार हे राष्ट्रवादीचे आमदार आहेत. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या कांचन कुल यांना ५,३०,९४० अशी एकूण ४१ टक्के मते मिळाली होती व सुप्रिया सुळे यांनी ६,८६,७१४ अशी ५३ टक्के मतांची बेगमी केली होती. तर पडळकरांना ४४,१३४ मतदान झाले होते. विजय शिवतारे हे जर निवडणूक रिंगणात उतरलेच तर त्यांची उमेदवारी नक्की कोणाची राजकीय गेम करणार , की दोन पवारांच्या साठमारीत स्वतःचा विजय निश्चित करू शकणार हे येणारा काळच ठरवेल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अडचण होऊ नये , महायुती मध्ये वाद होऊ नयेत म्हणून मी शिवसेनेतुन बाहेर पडण्यास देखील तयार आहे अशी भावना शिवतारे यांनी व्यक्त केली आहे. महाराष्ट्रातील नामचीन गुंड प्रवृत्तीच्या लोकांच्या मला धमक्या येत आहेत , फोन येत आहेत , पण मला गोळ्या घातल्या तरी चालेल , पण पवारांच्या पाशवी शक्ती विरोधात निवडणूक लढवणारच असा निर्धार विजयबापू शिवतारे यांनी बोलून दाखवला.

घोडा मैदान जवळच आहे , महायुतीचे नेते बापूंची समजूत घालण्यात यशस्वी होतात की बापू त्यांची लढाईची भूमिका कायम ठेवतात हे काही दिवसातच स्पष्ट होईल.

अजय निक्ते

अजय निक्ते

About Author

अजय निक्ते (Ajay Nikte) हे गेली २८ वर्षे मेनस्ट्रीम पत्रकारितेत कार्यरत आहेत. सामाजिक,सांस्कृतिक, कलाक्षेत्र ते गुन्हेगारी अशा विविध ठिकाणी त्यांची लेखणी लिहिती असली तरी , राजकीय पत्रकारिता हा त्यांचा आवडता विषय आहे. बातमी मागची बातमी आणि संबंधित विषयातील करंट अंडरकरंट्स अचूक हेरून ते लिखाणात उतरवणे ही त्यांची खासियत आहे. अजय उवाच या नावाने ते विविध विषयांवर ब्लॉगही लिहितात.यासह अभिनय ही त्यांची पॅशन असून ,अनेक मराठी ,हिंदी चित्रपट, सिरियल्स ,जाहिराती, शॉर्टफिल्म्स मध्ये त्यांनी अभिनयाचा ठसा उमटवला आहे. "मीडिया ,जर्नालिसम आणि ग्लॅमरवर्ल्ड" या विषयात, पालक आणि विद्यार्थी यांच्यासाठी ते अनेक संस्थांमध्ये व्याख्यानं देतात.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात