X: @therajkaran
लोकसभा निवडणुकीची (Loksabha Election) रणधुमाळी सुरु झाली असताना शिवसेना नेते विजय शिवतारे (Vijay Shivtare) यांनी आज पुन्हा एकदा बारामतीतून (Baramati) लढण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांची भेट घेतल्यानंतर विजय शिवतारे यांनी हा निर्धार व्यक्त केला आहे. मात्र, वेळ पडल्यास आपण कमळ चिन्हावरही लढू असंही शिवतारे यांनी म्हटलं आहे. अपक्ष लढण्यापेक्षा कमळाच्या चिन्हावर लढणं चांगलं असंही शिवतारे यांनी म्हटलं आहे. शिवतारे यांनी बारामतीतून लढण्यासाठी नवा पर्याय ठेवल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची मात्र डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.
शिवसेना नेते विजय शिवतारे यांनी आज मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन बारामतीतील लोकांचा कल काय आहे याची माहिती त्यांना दिली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना मोठी माहिती दिली. महायुतीच्या माध्यमातून ही सीट मिळाली आणि विजय शिवतारे उमेदवार असतील तर शंभर टक्के ही सीट धनुष्यबाणाच्या चिन्हावरही आपण जिंकू शकतो. बारामतीच्या मतदारांची तशी मानसिकता आहे, असा दावा विजय शिवतारे यांनी केला आहे. मी गेले 15-20 दिवस या मतदारसंघातून फिरत आहे. त्यामुळे माझा आत्मविश्वास आलाय. लोकांचा कल काय आहे? अंडरकरंट्स काय आहेत? हे मी सीएमला सांगितले. बेसिकली ही सीट गेल्या 10-20 वर्षापासून भाजपची होती. अगदी भाजपच्या चिन्हावर लढायची गरज पडली तरी माझी हरकत नाही. मी कमळावर लढायला तयार आहे. लोकांशी विचारमंथन करून मी या निर्णयाप्रत आलोय. अपक्ष लढणं हा नंतरचा भाग आहे. महायुतीत अशा पद्धतीने निर्णय झाला तर ते सोयीचं आहे, असं सांगतानाच इलेक्टीव्ह मेरिट हा निकष महायुतीत असला पाहिजे, असंही त्यांनी सांगितलं.
एक एक खासदार महत्त्वाचा आहे. मोदींना पंतप्रधान (PM Modi) बनवायचं आहे. मी नेत्यांना कमळावर लढण्याचा पर्याय दिला आहे. अपक्ष लढण्यापेक्षा ते चांगलं. मुख्यमंत्र्यांनी आता ही सीट महायुतीत मागून घ्यावी. या सीटबाबत भाजपच्या नेत्यांशी मी कशी चर्चा करू? माझे नेते एकनाथ शिंदे आहेत. त्यांच्याशीच मी चर्चा करेल. पण तशीच गरज पडली तर मी भाजपच्या नेत्यांशी बोलेल, असंही ते म्हणाले.
दरम्यान, सुनेत्रा पवार (Sunetra pawar) कुठल्याही परिस्थितीत निवडून येणार नाहीत. त्यामुळे सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांना फायदा होईल. अजित पवारांनी बारामती लोकसभा मतदारसंघात ठिकठिकाणी आपले दुश्मन तयार केले आहेत. त्यामुळे कुठल्याही थराला जाऊन त्यांना मदत केली जाणार नाही, असंही स्पष्ट शिवतारे यांनी सांगितलं.