उत्तरभारतीय विकाससेनेचा इशारा
X: @ajaaysaroj
मुंबई: राज ठाकरे यांची मनसे, भाजप – शिवसेना – राष्ट्रवादी महायुतीमध्ये येण्याची केवळ औपचारिकताच आता शिल्लक राहिली आहे. मात्र त्याआधीच उत्तर भारतीय विकास सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष पंडित सुनील शुक्ला यांनी, मनसेला भाजपने युतीमध्ये घेतल्यास मुंबईतील सर्व लोकसभा जागांवर उमेदवार उभे करण्याचा इशारा दिला आहे. त्याचप्रमाणे उत्तर प्रदेश, उत्तराखंड, बिहार , झारखंड या सर्वच ठिकाणी भाजपला तीव्र विरोध करण्याचे जाहीर करून खळबळ उडवली आहे.
परप्रांतीयांचे लोंढे तसेच महाराष्ट्रातील रोजगारावर होत असलेले परप्रांतीय आक्रमण या विरोधात थेट भूमिका घेत राज ठाकरे यांनी मनसे स्थापन झाल्यापासूनच आवाज उठवला होता. नोकरी संदर्भात होत असलेल्या परीक्षांसाठी आलेल्या परप्रांतीय विद्यार्थ्यांना मारहाण करण्यात आली होती. त्यानंतर राज्यात होणारे परप्रांतीय आक्रमण हा मुद्दा मनसेने जोर लावून धरला. यामुळे संपूर्ण देशभर खळबळ उडाली होती. देशातील विविध राजकीय आणि सामाजिक नेते राज ठाकरे यांच्या विरोधात रस्त्यावर उतरले होते. लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही ठिकाणी या आंदोलनाची धग पोहचली होती. अनेक उत्तर भारतीय नेत्यांनी तर राज ठाकरे यांच्या विरोधात जहाल भाषणे करून संपूर्ण वातावरण पेटवले होते. त्यावेळी भाजपसारख्या देशपातळीवर असणाऱ्या पक्षाने राज ठाकरे आणि त्यांची मनसे यापासून चार हात लांब राहण्याची भूमिका स्वीकारली होती. त्यानंतर गेल्या अनेक वर्षांत पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले. राज्यातील शिवसेना आणि राष्ट्रवादी हे दोन महत्त्वाचे पक्ष शब्दशः मोडीत निघाले. त्यामुळे होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीत सगळे गणितच बदलले आहे, आणि राज ठाकरे हे कोणत्याही क्षणी भाजप – सेना – राष्ट्रवादी महायुतीला मनसेचे इंजिन जोडतील अशी हवा निर्माण झाली आहे. केंद्रीय मंत्री अमित शाह, मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या बैठकांमधून हिरवा कंदील मिळाल्याने आता फक्त घोषणा बाकी आहे, अशी परिस्थिती आहे..
आता त्याचवेळी नेमके उत्तर भारतीय विकास सेना अध्यक्ष पंडित सुनील शुक्ला यांनी राज आणि भाजप यांच्या विरोधात थेट तोफ डागली आहे. मनसेचा उत्तर भारतीय विरोध आता मावळला असून राज यांनी व्यापक हिंदुत्ववादी भूमिका घेतली आहे असे त्यांच्या नजरेस आणताच, राज यांनी घेतलेली ही भूमिका भाजपच्या सांगण्यावरून घेतली असून त्यांच्या गळ्यात आलेला भगवा हा देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला आहे, असा आरोप पंडित शुक्ला यांनी केला. आमची संघटना उत्तर भारतीयांच्या स्वाभिमानाची गोष्ट करत असून या मुंबई महानगरात तब्बल ४२ टक्के हिंदी भाषिक रहात असल्याची आकडेवारी शुक्ला यांनी समोर ठेवली. भाजीवाले, रिक्षावाले, गोरगरीब मजदूर, फेरीवाले अशा उत्तर भारतीयांना करण्यात आलेली मारहाण हे हिंदी भाषिक विसरले नाहीत, भाजपने त्यांच्या राजकारणासाठी उत्तर भारतीयांना दुखवू नये, कोणत्याही परिस्थितीत राज ठाकरे यांच्या मनसेला उमेदवारी देऊ नये नाहीतर संपूर्ण मुंबईत महायुतीच्या विरोधात उमेदवार उभे करण्यात येतीलच, पण देशभर उत्तर भारतीय विकास सेना भाजपच्या विरोधात लढेल असा थेट इशाराच दिला आहे.
महाराष्ट्र ही आमची पण जन्मभूमी असून आमच्या तीन पिढ्या येथे राहत असल्याने आम्ही पण येथील भूमिपुत्र आहोत हे सगळ्यांनी लक्षात ठेवावे असा पवित्रा घेत, केवळ राजहंस सिंग आणि कृपाशंकर सिंग यांना पद दिले, आमदार केले म्हणजे उत्तर भारतीय खुष होणार नाहीत, उलट हे दोन नेते म्हणजे सगळा उत्तर भारतीय समाज नाही, असे देखील पंडित शुक्ला यांनी भाजपला सुनावले आहे.
भाजपने राज ठाकरे यांच्या मनसे बरोबर युती करू नये, अन्यथा मुंबईतील सहा मतदारसंघात उत्तर भारतीय विकास सेनेच्या उमेदवारांना तोंड देण्याची तयारी ठेवावीच, त्याचप्रमाणे संपूर्ण देशभरात उत्तर भारतीयांचा रोष पत्करावा असा गर्भित इशाराच उत्तर भारतीय विकास सेनेचे अध्यक्ष पंडित सुनील शुक्ला यांनी भाजपला दिला आहे.