मुंबई
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत कुख्यात गुंड निलेश घायवळ याचा फोटो समोर आल्यानंतर खळबळ उडाली आहे. आतापर्यंत एकनाथ शिंदेंचे सुपूत्र श्रीकांत शिंदेंचा फोटो कुख्यात गुंड हेमंत दाभेकर, अजित पवारांचा फोटो गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला असिफ मुहमंद इक्बाल शेख आणि अजित पवारांचे सुपूत्र पार्थ पवार यांचा फोटो गुंड गजा मारणे याच्यासोबत समोर आला होता. काही दिवसांपूर्वी भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदे गटाचे महेश गायकवाड यांच्यावर पोलीस ठाण्यात ६ गोळ्या झाडल्या. या घटनांमुळे राज्य सरकारवर चहूबाजूंनी टीका केली जात आहे. महाराष्ट्रात गुंडाराज सुरू असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. विजय वडेट्टीवार यांनीही तिन्ही फोटो शेअर करीत सरकारला धारेवर धरलं आहे.
त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं, निवडणुकांआधी महायुतीत गुंडांची भरती जोरात! निवडणुकीपूर्वी सत्तेतील तीनही पक्षात स्वतःची गँग मजबूत करण्यासाठी जबरदस्त स्पर्धा सुरू आहे.
- मुख्यमंत्री पुत्राची वर्षा बंगल्यावर हेमंत दाभेकरशी भेट.
- मुख्यमंत्र्यांची निलेश घायवाळ सोबत भेट.
- उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पिंपरी चिंचवडमधे गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या आसिफ महंमद इक्बाल शेख उर्फ असिफ दाढीशी भेट
- उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मुलाची गजा मारणेशी घरी जाऊन भेट.
गुंडांचे आदरतिथ्य करणाऱ्या सत्ताधाऱ्यांकडून जनतेने कायदा व सुव्यवस्थेची अपेक्षा कशी करावी? असा सवाल वडेट्टीवारांनी यावेळी उपस्थित केला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुण्यातील गुंड निलेश घायवळ यांच्यासोबतचा फोटो समोर आला आहे. पुण्यातील गँगस्टर म्हणून ओळख असलेला निलेश घायवळ याच्याविरोधात पुणे, पिंपरी-चिंचवडसह जिल्ह्यात विविध प्रकारचे १४ पेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत. शस्त्राचा धाक दाखवून खंडणी मागणे, खून, खूनाचा प्रयत्न असेही गुन्हा त्याच्यावर दाखल आहेत. २०२१ मध्ये पुणे पोलिसांनी त्याच्याविरोधात मोक्काची कारवाई केली होती.