X : @NalavadeAnant
मुंबई: महाविकास आघाडीच्या (Maha Vikas Aghadi) जागावाटपात सांगलीची लोकसभेची (Sangli Lok Sabha) जागा काँग्रेसला न सुटल्याने व ठाकरे गटाच्या शिवसेनेचे प्रमूख उद्धव ठाकरेंनी निर्णायक भूमिका घेतल्याने माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे नातू व स्थानिक काँग्रेसचे नेते विशाल पाटील (Vishal Patil) यांनी आपला अपक्ष उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केल्याने उध्दव ठाकरे यांची डोकेदुखी निश्चित वाढणार आहे, यावर आता शिक्कामोर्तबच झाल्याचे मानले जात आहे.
लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपाच्या वेळीच त्यांच्या पक्षांतील अंतर्गत दुफळ्या उफाळून आल्या होत्या. काँग्रेसच्या नेत्यांना त्यावेळी मुंबईत लोकसभेच्या किमान दोन तरी जागा हव्या होत्या. पण उध्दव ठाकरे गटाचे नेते खा. संजय राऊत (Sanjay Raut) यांनी त्यावेळी ताठर भूमिका घेत कॉँग्रेसला नावाला एक जागा देत बोळवण केली आणि नेमकी त्याच ठिकाणी काँग्रेस पक्षातील अंतर्गत असंतोष उफाळून आला. त्याची कुणकुण शरद पवार (Sharad Pawar) व उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) या दोघांनाही नक्कीच होती. असं काहीसं होणार याची कल्पना काँग्रेसच्या नेत्यांनाही होतीच. मात्र शरद पवार वगळता कुठल्याच नेत्यांनी याची दखल न घेता त्याकडे कानाडोळा केला. त्याचा फायदा घेत ठाकरे गटाने कोणाला विश्वासात न घेताच स्वतःकडे घसघशीत जागा परस्पर खेचून घेतल्या. त्यात या सांगलीचाही सहभाग आहे. त्यामुळे या असंतोषाच्या ज्वाळांची तीव्रता वाढली आहे. कारण सांगली हा काँग्रेस पक्षाचा एकेकाळचा प्रस्थापित गड मानला जातो. या जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीच्या इतिहासात पहिल्यांदाच नेत्यांच्याच नाकर्तेपणामुळे मतदान यंत्रांवर काँग्रेसचे अधिकृत चिन्ह पंजा नसणार आहे, हीच खरी खदखद पक्षाच्या स्थानिक नेते असोत की अगदी काँग्रेसचे जिल्ह्यातील कट्टर काँग्रेसी विचारधारेचे विविध क्षेत्रात नावाजलेले सम्राट असोत, त्यांच्या मनात खदखदत आहे.
याचा वेळीच सुगावा लागल्याने उध्दव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी खा. संजय राऊत यांना समेटासाठी सांगलीत पाठवले खरे. पण ते तर समेट घडवायचं सोडून आणखी आगीत तेल ओतून आले. त्यामूळे कालपर्यंत वातावरण निवळले अशा आशेवर असलेले स्थानिक माजी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम व अन्य नेत्यांनी इरेला पेटून विशाल पाटील यांना अपक्ष उमेदवारी अर्ज भरण्यास सांगितले व त्यांनीही तो भरला. अर्ज भरण्यापूर्वी विशाल पाटील यांनी त्यांचे खुरसुंडी या गावचे कुलदैवत सिद्धनाथाचे दर्शन घेत नाथांची आमच्यावर सदा कृपादृष्टी असल्याचे स्पष्ट केले. इतकेच काय तर त्यांनी एक्स या समाज माध्यमावर व्यक्त होताना येणारा काळ जरी कसोटीचा असला तरी सोबत संघर्षाचा वारसा आणि आपल्या सर्वांचे प्रेमाचे असणारे पाठबळ अगणित उर्जा देणारे असल्याचे भावनिक आवाहन तमाम कार्यकर्ते, पदाधिकारी व पक्षाच्या कमिटेड मतदारांना केले. त्यामूळे शिवसेना ठाकरे गटाकडून लढत देत असलेले हिंद केसरी चंद्रहार पाटील यांना ही निवडणुक लढवणे म्हणावे तितके सोपे राहिलेले नाही. उलट याचा परिणाम आता असाही होवू शकतो की ठाकरे गटाच्या प्रत्येक उमेदवारांशी काँग्रेसचे कार्यकर्ते, पदाधिकारी मनापासून कामच करणार नाहीत. आणि त्याची अपडेट उध्दव ठाकरेंपर्यंत पोहचल्याने त्यांची नव्याने डोकेदुखी वाढणार असल्याचे निरीक्षण राजकीय पंडितांनी नोंदवले आहे.