मुंबई : संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या बारामती लोकसभा ( Baramati Lok Sabha) मतदारसंघात पवार विरुद्ध पवार असा सामना रंगला आहे . या लोकसभा निवडणुकीत पाठिंबा वाढवण्यासाठी ज्येष्ठ नेते शरद पवारांनी (Sharad Pawar) बारामतीत आपली सर्व ताकद पणाला लावत अजित पवारांच्या( Ajit Pawar)खास शिलेदारांनाही गळ घालण्याचा सपाटा लावला आहे .याच पार्श्वभूमीवर आज त्यांनी माळेगाव कारखान्याचे माजी अध्यक्ष आणि अजितदादांचे निकटवर्तीय बाळासाहेब तावरे (Balasaheb taware) यांची भेट घेतली आहे.त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चाना उधाण आलं आहे .
बारामती लोकसभा (Baramati Lok Sabha) मतदारसंघामध्ये शरद पवार गटांकडून विद्यमान खासदार सुप्रिया सुळे (supriya sule )यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर अजित पवार गटाकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्री पवार (sunetra pawar )यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यानंतर या मतदारसंघामध्ये राजकीय वातावरण तापलं आहे . राष्ट्रवादीत बंड करून महायुतीत सामील झालेल्या अजित पवारांच्या विरोधात आता थोरल्या पवारांनी चांगलेच दंड थोपटले आहेत . यासाठी पूर्ण ताकदीने ते कामाला लागले आहेत . आज शरद पवारांनी माळेगाव येथील निवासस्थानी जात बाळासाहेब तावरे यांच्याशी चर्चा केली. तावरे हे उपमुख्यमंत्री अजित पवार गटाचे नेते आहे. त्यामुळे या भेटीने बारामतीच्या राजकीय वर्तुळातून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या भेटीवेळी त्यांनी “तुम्ही माझ्या आणि सुप्रिया सुळेंच्या बरोबर आहात असे मी समजतो,” अशा मोजक्या शब्दात त्यांना गळ घातली आहे. दरम्यान या निवडणुकीसाठी बारामतीतील साखर पट्ट्यातून तुतारी चिन्हाला मोठा पाठिंबा मिळवण्यासाठी पवारांनी आपली शक्ती पणाला लावली आहे. या भेटी घेताना पवारांनी दशकांचे वैर बाजूला ठेवून सुप्रिया सुळे यांच्यामागे मोठी ताकद उभी करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्यामुळे पवार बारामतीत कोणता डाव टाकणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
दरम्यान या भेटीबाबत बाळासाहेब तावरे म्हणाले, ही राजकीय भेट नव्हती. पवारांशी कोणत्याही प्रकारची राजकीय चर्चा झाली नाही. त्यांचे आणि माझ्या कुटुंबाचे पूर्वीपासून सलोख्याचे संबंध राहिलेले आहेत. यातूनच ते माझ्या घरी आले होते. आमच्यात आरोग्य आणि कौटुंबिक चर्चा झाल्याचे तावरेंनी स्पष्ट केले आहे .