मुंबई : एअरटेलनंतर आता वोडाफोन-आयडिया कंपनीनेही दूरध्वनी ग्राहक सेवा मराठीत सुरू करण्याची ग्वाही दिली आहे. कंपनीने शिवसेना (ठाकरे गट)चे राज्य संघटक व शिवसंचार सेनेचे अध्यक्ष अखिल चित्रे यांना पत्र लिहून याबाबत आश्वस्त केले आहे.
अलीकडे काही दिवसांपासून मोबाईल गॅलरीमध्ये ग्राहकांशी मराठीत संवाद साधण्यास नकार देणाऱ्या कर्मचाऱ्यांमुळे वाद निर्माण झाला होता. यावर शिवसेना (ठाकरे गट)ने आक्रमक भूमिका घेतल्यानंतर एअरटेलनंतर वोडाफोन-आयडिया कंपनीनेही मराठीत सेवा सुरू करण्याचे ठरवले आहे.
याअंतर्गत वोडाफोन-आयडिया कंपनी आपल्या गॅलरी आणि ग्राहक सेवा केंद्रांमध्ये मराठी भाषेत सेवा देण्यासाठी मराठी तरुण-तरुणींची नियुक्ती करणार आहे. त्यामुळे मराठी ग्राहकांना त्यांच्या मातृभाषेत संवाद साधण्याची सुविधा मिळणार आहे.