नागपूर : राजकारणात अनेकदा मतभेद होतात. बरेचदा उमेदवारी न मिळाल्यामुळे नाराजी निर्माण होते. परंतु,मतभेद आणि नाराजीचे पर्यावसन गटबाजीत होऊ देऊ नका. पक्षांतर्गत गटबाजी अजिबात खपवून घेतली जाणार नसल्याचे सुतोवाच केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शाह यांनी केले.
नागपुरातील भाजप पदाधिकाऱ्यांच्या कार्यकर्ता बैठकीत आज, मंगळवारी ते बोलत होते. विशेष म्हणजे उपस्थित हजारो पदाधिकाऱ्यांकडून त्यांनी ही बाब वदवून घेतली. नागपुरातील सुरेश भट सभागृहात आयोजित विदर्भातील 62 विधानसभांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या कार्यकर्ता बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पक्षाचे राज्य प्रभारी भूपेंद्र यादव, राष्ट्रीय सहसंघटनमंत्री शिव प्रकाश, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, निवडणूक संचालन समितीचे अध्यक्ष रावसाहेब दानवे, मध्यप्रदेशचे मंत्री कैलास विजयवर्गीय, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, माजी केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर, रणधीर सावरकर प्रामुख्याने उपस्थित होते.
याप्रसंगी शाह म्हणाले की, एका तिकीटासाठी अनेक दावेदार असतात. मात्र सर्वेक्षण, जातीय समीकरणे इत्यादी बाबी पाहून उमेदवारी निश्चित करावी लागते. जर तिकीट मिळाले नाही तर त्यावरून कुणीही असंतुष्ट होऊन त्यावर गोंधळ घालत आहे असे प्रकार विदर्भात दिसायला नको. सर्वांनी कटुता दूर सारून महायुतीसाठी मैदानात उतरले पाहिजे.
एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचा धनुष्यबाण व अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे चिन्ह असलेल्या घड्याळीच्या उमेदवारांचा कमळाप्रमाणेच पूर्ण ताकदीने प्रचार झाला पाहिजे, असे अमित शाह यांनी स्पष्ट केले.
भाजपचे महाराष्ट्रातील नेते विदर्भात महायुतीला 40 ते 42 जागा मिळाव्यात यासाठी प्रयत्न करत आहेत. मात्र जर महाराष्ट्रात सत्ता हवी असेल तर विदर्भात कमीत कमी 45 जागांवर विजय आवश्यक आहे. त्यामुळे त्या दृष्टीने नियोजन करायला हवे, असे निर्देश अमित अमित शाह यांनी दिले.
यावेळी अमित शहा यांनी भाजपच्या प्रत्येक पदाधिकाऱ्याने बुथपातळीवर जाऊन काम करण्याचे आवाहन केले. महाविकास आघाडीतील शिवसेना, राष्ट्रवादी व कॉंग्रेसचे बुथपातळीवरील कार्यकर्ते भाजपमध्ये आणण्यासाठी प्रयत्न करा. विरोधकांना बुथपातळीवर कमकुवत करण्यावर भर द्या, असे निर्देश शहा यांनी दिले.
देशभरात वक्फ संशोधन बिलावरून विविध चर्चांना उधाण आले आहे. याबाबत गृहमंत्री अमित शाह यांनी महत्त्वाची माहिती दिली. हे बिल संसदेच्या पुढील अधिवेशनात मंजूर होईल, असे शाह यांनी सांगितले.