महाविकास आघाडीला धक्का
X @ajaaysaroj
मुंबई: लोकसभा निवडणुकीच्या ऐन धामधुमीत काँग्रेसचा सुशिक्षित सॉफीस्टिकेटेड चेहरा, संयमी प्रवक्ते, राज्याचे प्रदेश सरचिटणीस डॉ राजू वाघमारे यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश केला आहे. वाघमारे यांच्या सेनाप्रवेशाने पक्षाची बाजू प्रभावीपणे मांडणारा अभ्यासू वक्ता काँग्रेसने ऐन निवडणुकीत गमावला आहे.
गेली जवळपास ३६ वर्षे विविध व्यासपीठावरून डॉ वाघमारे यांनी काँग्रेसची आणि महाविकास आघाडीची बाजू अत्यंत प्रभावीपणे मांडण्याचे काम केले आहे. आकडेवारीसह, मुद्देसूद बोलणे हे वाघमारे यांचे वैशिष्ट्य आहे. एका सर्व्हे नंतर, वीस वीस तास काम करणारे, कॉमन मॅनचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच आहेत असे प्रांजळपणे एका कार्यक्रमात जाहीरपणे डॉ वाघमारे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्याबद्दल उद्गार काढले होते, त्यानंतर त्यांच्यावर काँग्रेस व महाविकास आघाडीतून टीका देखील झाली होती.
आज शिवसेनेतील प्रवेशानंतर ते माध्यमांशी बोलले. आजची देश पातळीवर काम करणारी, शंभर वर्षांची परंपरा असणारी काँग्रेस, राज्यातील एक प्रादेशिक पक्ष शिवसेना चालवत आहे. माजी मुंबई प्रदेश काँग्रेस अध्यक्ष व माजी खासदार संजय निरुपम यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याला काँग्रेस सोडून जायला लागावे अशी वागणूक जाणूनबुजून दिली जात आहे. परंपरागत असलेली अत्यंत प्रतिष्ठेची सांगलीची जागा काँग्रेसला खिजगणतीतही न धरता शिवसेना उबाठा गट जाहीर करते. ही जागा काँग्रेसची आहे असे सांगायला काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना रक्त सांडावे लागत आहे, तर भिवंडी या हक्काच्या जागेवर शरद पवार राष्ट्रवादीचा उमेदवार जाहीर करतात, जणू काही काँग्रेसला महाविकास आघाडीत काडीचीही किंमत नाही अशी खंत डॉ वाघमारे यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली. याला कारणीभूत राज्यातील काँग्रेसचे काही नेते आहेत. काँग्रेसमध्ये राज्य पातळीवर अत्यंत गलिच्छ राजकारण सुरू आहे. काँग्रेसचे हजारो कार्यकर्ते आपल्या संपर्कात असून, हे दबलेल्या अवस्थेत काम करणारे काँग्रेसचे सामान्य कार्यकर्ते संपूर्णपणे भांभावलेल्या आहेत, त्यांना दिशा देण्यासाठीच मी काँग्रेस सोडत आहे, असेही डॉ वाघमारे यांनी स्पष्ट केले. बहुतांश नेते हे ए सी मधून फिरणारे असतात, पण शिंदे हे जनसामान्य माणसाचे लोकांमध्ये मिसळणारे, रस्त्यावर उतरून काम करणारे मुख्यमंत्री आहेत हे मान्य करावेच लागेल असेही त्यांनी प्रवेशावेळी सांगितले.
महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोप करायला आता कुठे सुरुवात होईल, अशा ऐन लढाईच्या क्षणी डॉ वाघमारे यांच्यासारख्या संयत बोलणारा, आपल्या पक्षाची बाजू जोरकसपणे मांडणारा अभ्यासू प्रवक्ता काँग्रेसने आणि महाविकास आघाडीने गमावला आहे. शिवसेनेत प्रवेश केलेल्या डॉ राजू वाघमारे यांच्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय जबाबदारी देतात हे येणाऱ्या काही दिवसांतच समोर येईल.