Twitter : @NalavadeAnant
मुंबई
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये २००९ मध्ये आम्हा सर्वांना बोलावण्यात आले आणि लोकसभा निवडणूक शिवसेनेसोबत लढविण्याचे ठरविले गेले होते. मात्र, काही कारणामुळे ते नंतर घडले नाही, असा गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल (MP Sunil Tatkare) तटकरे यांनी मंगळवारी येथे केला.
२०१४ मध्येही भाजपला (BJP) पाठिंबा दिला गेला होता. अशी स्थित्यंतरे अनेक घडली आहेत, मग आता आम्ही भाजपसोबत जाऊन काय चूक केली? असा सवाल करत, उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी निवडलेल्या मंत्रीमंडळातील लोकांचे अनेकांनी कौतुक केले, मात्र आमचेच काहीजण आजही टिका करत आहेत, काही जणांना नैराश्य आल्याचा सणसणीत टोला खा. तटकरे यांनी शरद पवार गटाच्या नेत्या खा. सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांचे नाव न घेता लगावला.
यंत्रणांच्या भीतीने आम्ही भाजपसोबत गेलो, अशी टिका आता करत आहेत. परंतु स्वतःच्या सावलीलाही घाबरणाऱ्या लोकांनी आमच्यावर टिका करणे कितपत योग्य आहे, असे सांगत खा. तटकरे यांनी पुन्हा एकदा अप्रत्यक्षपणे खा. सुप्रिया सुळे यांच्यावर निशाणा साधला.
राज्यात जाहीर झालेल्या ग्रामपंचायत निवडणूक निकालात (Gram Panchayat election results) दोन नंबरला राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) राहिली आहे, याचा अर्थ अजित पवार यांनी घेतलेल्या निर्णयाला जनतेने पाठिंबाच दिला आहे. या राज्यातील महिला भगिनींचा आलेख उंचवायचा असेल तर अजित पवार यांच्याशिवाय पर्याय नाही, हेही जनतेने दाखऊन दिल्याचा दावाही तटकरे यांनी केला.
आता आपल्याला देशात नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा एनडीएचे सरकार (NDA government) आणि राज्यात महायुतीचे सरकार (Maha Yuti government) आणायचे आहे. त्यासाठी सर्वांनी कामाला लागा, असे आवाहनही खा. तटकरे यांनी केले.