मुंबई – राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तो स्वीकारल्याची घोषणा केली. मात्र, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सरचिटणीस रिटा गुप्ता यांनी मुख्यमंत्र्यांवरच निशाणा साधला आहे. “देवेंद्रजी, संतोष देशमुख प्रकरणात धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतलात, पण अकार्यक्षम गृहमंत्री म्हणून आपण नैतिकतेच्या आधारावर कधी राजीनामा देणार?” असा थेट सवाल त्यांनी केला आहे.
गुप्ता यांनी फेसबुकवर पोस्ट करत राज्यातील कायदा-सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले. गेल्या सहा महिन्यांत राज्यात ४५ हून अधिक बलात्काराच्या घटना घडल्या असून, किती प्रकरणांमध्ये दोषींना शिक्षा झाली याचा कोणताही हिशेब नाही, असे त्यांनी नमूद केले. “आज महाराष्ट्रात महिला आणि मुली सुरक्षित नाहीत. गुन्हेगार बिनधास्तपणे सूडबुद्धीने खून करत आहेत. कायद्याचा धाकच उरलेला नाही. हे सरकारच्या अपयशाचे प्रतीक आहे,” अशी घणाघाती टीका त्यांनी केली.
“गुंडांना सरकारचा पाठींबा?”
पुण्यातील स्वारगेट प्रकरणात “पीडित महिलेने अत्याचार होत असताना आवाज केला नाही,” असे वादग्रस्त वक्तव्य काही लोकप्रतिनिधींनी केले होते. मात्र, अशा बेताल वक्तव्यांवर सरकारने कारवाई का केली नाही, असा सवाल गुप्ता यांनी उपस्थित केला. तसेच, भाजप आमदार रक्षा खडसे यांच्या मुलीच्या छेडछाडीच्या प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी “एक विशिष्ट पक्षाच्या लोकांनी हे कृत्य केले आहे,” असे जाहीर विधान करून प्रकरणाला राजकीय रंग दिल्याचा आरोपही त्यांनी केला.
“आर. आर. पाटील यांना राजीनामा द्यावा लागला, मग तुम्हाला का नाही?”
रिटा गुप्ता यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारच्या काळातील उदाहरण देत म्हटले की, “गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी एका प्रकरणात फक्त एक वाक्य उच्चारले होते आणि त्यांना राजीनामा द्यावा लागला होता. मग तोच न्याय आज गृहमंत्री म्हणून मुख्यमंत्र्यांना का लागू होत नाही?”
संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपींनी अमानुषपणे अत्याचार केल्याचे पुराव्यांमध्ये स्पष्ट दिसत आहे. “आरोपींपैकी एकजण संतोष देशमुख यांच्या चेहऱ्यावर लघवी करताना आढळला. हा प्रकार फक्त एका व्यक्तीवर नाही, तर संपूर्ण राज्य सरकारच्या निष्क्रीय आणि कमकुवत कार्यपद्धतीवर थेट प्रहार आहे,” अशी कठोर टीका त्यांनी केली.
“मुख्यमंत्री, उत्तर द्या!”
गुप्ता यांनी सरकारमधील नेते गुंडांना खुलेआम पाठीशी घालत असल्याचा आरोप करत, “हेच लोक गुन्हेगारी टोळ्यांचे मुखिया झाले आहेत,” असे म्हटले. “धनंजय मुंडे यांचा राजीनामा नैतिकतेच्या आधारावर घेतला, पण एक अपयशी गृहमंत्री म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कधी राजीनामा देणार?” असे थेट आव्हान त्यांनी दिले.