मुंबई : मोगल राजा औरंगजेब हा एक कुशल प्रशासक होता” अशा शब्दांत सोमवारी प्रसार माध्यमांशी बोलताना सपा आ. अबू आझमी यांनी औरंगजेबाचे उदात्तीकरण करण्याचे तीव्र पडसाद मंगळवारी विधानसभेत उमटले. सत्ताधारी सदस्यांनी आझमी यांच्या निलंबनाची मागणी आक्रमकपणे लावून धरल्याने झालेल्या गोंधळात सभागृहाचे कामकाज सुरुवातीला दहा मिनिट तर नंतर अर्धा तासासाठी तहकूब करावे लागले.
अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या आजच्या दुसऱ्या दिवशी तारांकित प्रश्नांची सुरुवात होण्याआधीच सत्ताधारी आमदारांनी अबू आझमी यांच्या तात्काळ निलंबनाची मागणी करत जोरदार घोषणाबाजी केली. यावर बोलताना भाजपचे ज्येष्ठ आमदार व माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार, अतुल भातखळकर तर शिवसेनेचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या.
आज आझमी यांच्या या वादग्रस्त वक्तव्यावर खरेतर विरोधी पक्ष आक्रमक होईल असे सर्वांनाच वाटत असताना विरोधी बाकावरचे आमदार मात्र शांत बसून होते. परंतु कोणतीही अपेक्षा नसताना अचानक यावर सत्ताधारी आमदारच आक्रमक होत गोंधळ घालू लागले. विधानसभेतील उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेना गटाचे नेते भास्कर जाधव यांना बोलण्याची संधी मिळाली असताही, सत्ताधारी पक्षाने गदारोळ केल्याने उपस्थित सर्वच जण अचंबित झाले. मात्र हाच मुद्दा सत्ताधारी सदस्यांनी लावून धरत आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्याने सभागृहातील परिस्थिती नियंत्रणाच्या बाहेर गेल्याने आझमी यांच्या निलंबनाचा मुद्दा आणखी चिघळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.