महाराष्ट्र ताज्या बातम्या

मनसेच घोडं नक्की कुठं अडलं?

X: @ajaaysaroj

राज ठाकरे आणि अमित शाह यांच्या भेटीला आता जवळपास दोन आठवडे होत आले. बहुचर्चित आणि संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेतलेली ही अमित शाह – राज ठाकरे भेट महायुतीतील मनसेच्या संभाव्य प्रवेशाची अंतिम चाचपणी होती असे म्हटले तर वावगं ठरू नये. पण पंधरा दिवस होत आले तरी मनसेच्या महायुतीतील प्रवेशाचे घोडं नक्की कुठं अडलं असा प्रश्न आता विचारला जाऊ लागला आहे. उत्तर भारतीय मतांचा फटका आपल्याला देशपातळीवर बसेल अशी भीती भाजपला आहे का अशी चर्चा देखील त्यामुळे सुरू झाली आहे.

खरंतर भाजप बरोबर पूर्वीच्या एकसंघ शिवसेनेने काडीमोड घेतल्यापासूनच भाजपच्या मनसेसह हातमिळवणीच्या चर्चांना सर्वत्र उत आला होता. भाजप नेते नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस, आशिष शेलार यांनी देखील अधूनमधून राज ठाकरे यांच्या भेटी घेऊन भाजप – मनसे युतीचा मुद्दा कायम चर्चेत राहील याची काळजी घेतली. राज ठाकरे यांनी पण एकदा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेटही घेतली. अर्थात या सर्व भेटीगाठी राजकारण विरहित होत्या असे माध्यमांपुढे येऊन सांगायला यातील कुठलाही नेता विसरला नाही. पण उद्धव ठाकरे यांनी भाजपाची साथ सोडून थेट शरद पवार, सोनिया गांधी यांचे हात धरल्यावर, भाजपने देखील राज यांच्याशी जवळीक साधायला जास्त जोर लावला. एक ठाकरे हात सोडून गेल्यावर किमान मुंबई, पुणे, नाशिक, ठाणे, कोकण या लोकसभेच्या महाराष्ट्रातील जवळपास निम्म्या जागांवर प्रभाव पाडणारा एकतरी ठाकरे आपल्याबरोबर हवाच असा राजकीय दृष्टीने सोयीचा विचार करून भाजपने पावले टाकायला सुरुवात केली. केवळ मराठी माणूस, मराठी मुद्दा या पुरताच राज ठाकरे यांनी सीमित न राहता हिंदुत्वाच्या मोठ्या कॅनव्हासवर यावे असा धोरणी विचार करून, मराठी भाषेतील पाट्या याबरोबरच मशिदीवरील भोंगे हा हमखास हिट ठरणारा पत्ता राजकीय गेममध्ये उतरवला गेला.

त्याला विरोध होईल हे गृहीत धरूनच, पुढची स्ट्रॅटेजी म्हणून महाआरत्या आयोजित करण्यात आल्या. एका हनुमान मंदिरातील आरती समयी राज यांना भगवी शाल प्रदान करून थेट बाळासाहेबांच्या स्टाईलशी मिळतेजुळते हिंदुजननायक म्हणून पुन्हा प्रोजेक्ट करण्यात आले. हिंदुजननायक असे प्रोजेक्ट करण्यामागे, परप्रांतीय लोंढे याबाबत राज यांची असलेली टोकाची भूमिका कुठेतरी मवाळ होत आहे, मराठी मुद्द्यांवर राज प्रचंड ठाम असले तरीही, ते हिंदुत्वाच्या बाबतीतही अत्यंत कट्टर आहेत असे सुचवत, अनेक वर्षांपासून त्यांची असलेली उत्तर भारतीय विरोधी इमेज पुसण्याचा प्रयत्न केला गेला.

मग, लोकसभा निवडणुका जशा जवळ आल्या, राजकीय वातावरण जसे तापू लागले तसे एक दिवस अचानकच मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे अमित ठाकरेंसह दिल्लीत केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या भेटीला निघाले अशा बातम्या येऊन थडकल्या. दिल्लीत पोहचल्यावर राज यांनी त्यांच्या नेहमीच्या स्टाईल मध्ये , “त्यांनी मला बोलावले म्हणून मी आलो” , असे माध्यमांसमोर मोघम बोलत सस्पेंस कायम ठेवला. दुसऱ्या दिवशी सकाळी भाजपचे महासचिव विनोद तावडे यांनी राज यांची दिल्लीत ताज मानसिंग या तारांकित हॉटेलमध्ये भेट घेतली. या ठिकाणी त्यांना भाजपचा अधिकृत प्रस्ताव काय आहे त्याची कल्पना देण्यात आली, ज्या प्रस्तावावर आधीच मुंबईत देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज यांनी अनौपचारिक चर्चा केली होती. त्यानंतर तावडे, राज यांना घेऊन अमित शाह यांच्या भेटीला गेले. हसतखेळत झालेल्या भेटीचे फोटो मग माध्यमांवर झळकले.

त्याच बरोबर मनसेने लोकसभेच्या तीन जागा भाजपकडे मागितल्या आहेत पण भाजप दोन जागा द्यायला तयार होईल अशा बातम्याही आल्या. दक्षिण मुंबईची जागा मनसे लढवेल आणि त्याच बरोबर नाशिक, कल्याण किंवा शिर्डी यातील एक जागा मिळावी अशी मागणी भाजपाकडे करण्यात आल्याचेही या बातम्यांमध्ये सांगण्यात आले. त्यानंतर मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी देखील दोन जागांचा प्रस्ताव भाजपला देण्यात आला आहे असे अधिकृतपणे माध्यमांसमोर येऊन सांगितले. जर दक्षिण मुंबई जागा मिळालीच तर नांदगावकरच इथून महायुतीचे उमेदवार असतील असेही जवळपास निश्चित झाल्याचे बोलले जाऊ लागले. शिर्डी आणि नाशिक यापैकी एक जागा मिळणार असे वाटत असतानाच शिवसेनेने शिर्डी लोकसभेचा अधिकृत उमेदवार जाहीर करून त्या जागेचा प्रश्न निकाली काढला. तर नाशिकच्या जागेवर भाजप आणि शिवसेना यांच्यामध्येच तुफान रस्सीखेच सुरू असताना अचानकच राष्ट्रवादीच्या छगन भुजबळ यांचे नाव पुढे आले आहे. आपले नाव हे थेट दिल्लीच्या श्रेष्ठींकडून सुचवण्यात आले असल्याचे माध्यमांसमोर सांगून भुजबळ यांनी शिवसेनेला गॅसवर ठेवलेच पण जर मनसे खरोखरच महायुती मध्ये येणार असेल तर नाशिकच्या जागेवर संभ्रम निर्माण केला. मनसे महायुतीमध्ये सामील होण्याचे घोंगड या सर्व जागावाटपामुळेच भिजत पडले असावे अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

हे सगळे सुरू असतानाच पश्चिम मुंबई मध्ये उत्तर भारतीय विकास सेनेचे अध्यक्ष पंडित सुनील शुक्ला यांनी देखील भाजपने मनसेला महायुती मध्ये घेतले तर त्याचे परिणाम मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघात पाहायला मिळतीलच पण देशपातळीवर देखील भाजपला याचा फटका बसेल असा थेट इशारा दिला. त्याच प्रमाणे दिल्लीत देखील उत्तर प्रदेश व बिहार मधील दोन प्रमुख नेत्यांनी, जर भाजप मनसे युती झालीच तर तातडीने पत्रकार परिषद घेऊन भाजपला अडचणीत आणायचे , व भाजप प्रांतवादी नेत्याला आणि त्याच्या पक्षाला साथ देते असे चित्र संपूर्ण देशात निर्माण करायचे असे ठरवल्याचे समजते. या सर्व गोष्टींचा फटका देशपातळीवर बसू नये यासाठी लोकसभा निवडणुकीत मनसेला तटस्थ राहायला सांगून विधानसभेत थेट भाजप समवेत घ्यायचे असा विचार भाजप श्रेष्ठींनी केला असावा अशी शक्यता बोलून दाखवली जात आहे.

गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे यासंदर्भात आपली भूमिका स्पष्ट करतील असे एकंदरीत चित्र असले तरी बेभरवशी राजकारणात अगदी उद्या परवा देखील कधी काय होईल हे सांगता येत नाही हेच खरे.

अजय निक्ते

अजय निक्ते

About Author

अजय निक्ते (Ajay Nikte) हे गेली २८ वर्षे मेनस्ट्रीम पत्रकारितेत कार्यरत आहेत. सामाजिक,सांस्कृतिक, कलाक्षेत्र ते गुन्हेगारी अशा विविध ठिकाणी त्यांची लेखणी लिहिती असली तरी , राजकीय पत्रकारिता हा त्यांचा आवडता विषय आहे. बातमी मागची बातमी आणि संबंधित विषयातील करंट अंडरकरंट्स अचूक हेरून ते लिखाणात उतरवणे ही त्यांची खासियत आहे. अजय उवाच या नावाने ते विविध विषयांवर ब्लॉगही लिहितात.यासह अभिनय ही त्यांची पॅशन असून ,अनेक मराठी ,हिंदी चित्रपट, सिरियल्स ,जाहिराती, शॉर्टफिल्म्स मध्ये त्यांनी अभिनयाचा ठसा उमटवला आहे. "मीडिया ,जर्नालिसम आणि ग्लॅमरवर्ल्ड" या विषयात, पालक आणि विद्यार्थी यांच्यासाठी ते अनेक संस्थांमध्ये व्याख्यानं देतात.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात