विश्लेषण राष्ट्रीय

नितीन गडकरींच्या संभाव्य पंतप्रधानपदाच्या संधीला कोण घालतोय खो?

Twitter : @vivekbhavsar

 नवी दिल्ली

मराठी आणि खासकरून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विश्वासपात्र नितीन गडकरी यांच्याविरोधात भारतीय जनता पक्षाकडून पुन्हा एकदा षड्यंत्र रचले जात आहे की काय अशी शंका यावी अशा काही घटना गेल्या काही दिवसात घडल्या आहेत. एका विशिष्ट राजकीय परिस्थितीत गडकरी हे देशाचे प्रधानमंत्रीपदी बसू शकतील अशी दाट शक्यता निर्माण झाल्याने केवळ गडकरी यांच्याच खात्यात गडबड झाल्याचा कॅग अहवाल बाहेर काढण्यात आला, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

2024 च्या लोकसभा निवडणुका अवघ्या 8 ते 9 महिन्यांवर येऊन ठेपलेल्या आहेत. अशात कॅगच्या अहवालात केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या खात्याच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचा दावा करण्यात आला आहे. 2014 पासून सलग 9 वर्ष रस्ते वाहतूक हे मंत्रालय सांभाळणाऱ्या गडकरींनी देशात केलेलं काम सगळ्यांना माहित आहे. देशातल्या विकासात सर्वात मौल्यवान योगदान गडकरी यांनीच दिल्याचे मानले जाते. अशा स्थितीत कॅगच्या अहवालात CAG report) त्यांच्या खात्यावर जाणीवपूर्वक ताशेरे ओढून त्यांना पंतप्रधानपदाच्या चर्चेतून बाद करण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याची चर्चा आहे.

भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाच्या इशाऱ्यावरूनच हे सगळं करण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे. 2024 च्या निवडणुकीत जर भाजपाला 25 0 पेक्षा जास्त जागा जिंकता आल्या नाहीत, तर नरेंद्र मोदी यांच्याऐवजी दुसरा चेहरा पंतप्रधानपदासाठी असेल, अशी चर्चा आहे. अशा स्थितीत नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांचे नाव आघाडीवर असेल. त्यामुळे आत्तापासूनच गडकरी यांचे पंख छाटण्यात येत असल्याची चर्चा आहे.

नितीन गडकरी पंतप्रधानपदाचे दावेदार?

गेल्या ९ वर्षांत केंद्र सरकारमध्ये आपल्या कामगिरीमुळं सर्वाधिक लोकप्रिय मंत्री अशी नितीन गडकरी यांची ओळख आहे. काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत त्यांनी रस्त्यांचे मोठं जाळे उभे केले आहे. टोल नाक्यावरील फास्ट टॅग असो वा गंगा स्वच्छतेचं काम असो, गडकरींनी हिरीरीने ही कामं मार्गी लावलेली आहेत. पर्यावरण बचावासाठी पेट्रोल आणि डिझेलला देशातून हद्दपार करण्याचा विडा त्यांनी उचललेला आहे. त्यासाठी हायड्रोजन, सीएनजी, इथेनॉल यासारख्या इंधनांचा वापर करण्यासाठी ते सातत्यानं प्रयत्नशील असल्याचे दिसत आहे. नितीन गडकरी यांचं सर्वाधिक वैशिष्ठ्य म्हणजे त्यांचे सर्वपक्षीयांशी असलेले जिव्हाळ्याचे संबंध. कोणत्या पक्षाचा खासदार आहे हे न पाहता ते विकास कामांसाठी धावून येतात, त्यामुळं काँग्रेससह सर्वच विरोधी पक्ष नेतेही गडकरींच्या कामाचे कौतुक करताना पाहायला मिळतात.

भाजपाच्या सध्याच्या टोकाच्या विरोधाच्या भूमिकेत गडकरी यांचं हे सर्वपक्षीय मैत्र त्यांच्यासाठी जमेची बाजू मानण्यात येते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय असलेल्या नागपुरात गडकरी खासदार आहेत. अगदी कमी वयात संघाशी जोडले गेलेले नितीन गडकरी यांचे संघात वरिष्ठ नेत्यांपासून छोट्या संघ स्वयंसेवकाशी त्यांचे चांगले संबंध आहेत. सूडाचं नव्हे तर बेरजेचं राजकारण हे गडकरींच्या राजकारणाचं वैशिष्ठ्य आहे. या सगळ्या कारणांमुळेच 2024 च्या लोकसभा निवडणुकांनंतर नरेंद्र मोदी यांना पर्याय म्हणून गडकरींचं नाव पुढं येण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.

किशोर तिवारी यांचंही मोदी – शाह यांच्यावर निशाणा

“ऐन लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजण्याच्या आधी सी.ए.जी. अहवालाचे निमित्त करून एका मागून एक असे राष्ट्रीय महामार्ग भ्रष्टाचार प्रकरणे उकरून काढले जात आहेत. यात षडयंत्रपूर्वक महाराष्ट्रातील व विदर्भातील झुंझार नेते नितीन गडकरी यांना बदनाम करण्याचे मोदी – शाह यांचे पातक असून गडकरी यांना या प्रकरणात नाहक गोवण्याचा प्रकार आहे”, असा घणाघाती प्रहार शेतकरी नेते किशोर तिवारी (Farmers leader Kishor Tiwari) यांनी केला आहे.

यात वास्तविकता अशी आहे की द्वारका एक्सप्रेस हायवे ज्या दिल्लीतील अती गजबजलेल्या दाट वस्तीतून जातो, त्या रस्त्यासाठी भूमी अधिग्रहण किंमत ही देशात सर्वात जास्त आहे. रू. २०,000 ते २५,००० प्रति स्क्वेअर फूट प्रमाणे भूमी अधिग्रहण हा न्यायालयाने ठरवून दिलेला दर आहे. हा दर दिल्ली उच्च न्यायालयाने ग्राह्य ठरविल्यानंतर ११०.६ कोटी प्रति एकर प्रमाणे भूमी अधिग्रहण खर्च झाला. एकूण २९ किलोमीटर अंतराच्या १० पदरी रस्त्याच्या कामासाठी २३५ कोटी रुपयांचा प्रति किलोमिटर खर्च असा भूमी अधिग्रहण खर्च झाला असताना, ही वास्तविक बाब रेकॉर्डवरून लपवून ठेवली जात आहे. तसेच इतरही हायवे प्रकल्पात घोळ करून नितीन गडकरी यांनी खूप मोठा भ्रष्टाचार केला आहे, असे देशाला भासविले जात आहे. हा एक प्रकारे महाराष्ट्र आणि विदर्भातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित मोठे नेतृत्व संपवण्याचा मोठा कार्यक्रम भाजपातील कलुशित विचारसरणीच्या लोकांनी हाती घेतला आहे, असा आरोप किशोर तिवारी यांनी केला आहे.

राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या दुसऱ्या टर्मची संधी असताना पंख छाटले

नितीन गडकरी यांचा प्रवास संघ, अभाविप या संघ विचारांच्या संघटनांतून पुढे सरकत राज्यात भाजप सत्तेत आल्यावर मंत्रिपद आणि त्यानंतर केंद्रातील भाजप सरकारमध्ये मंत्री असा प्रवास झाला. नितीन गडकरी महाराष्ट्रात 1995 साली शिवसेना-भाजपा युतीच्या सरकारच्या काळात जास्त चर्चेत आले. मुंबईत त्यांनी बांधलेले 55 उड्डाणपुल (Flyovers in Mumbai) आणि मुंबई-पुणे एक्सप्रेसवेमुळं (Mumbai – Pune Expressway) गडकरी यांची कार्यक्षमता सिद्ध झाली. त्यानंतर 2010 ते 2013 या भाजपाच्या अत्यंत अडचणीच्या काळात त्यांना भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून दिल्लीत पाठवण्यात आलं. 2013 साली गडकरींना पुन्हा पक्षाचं राष्ट्रीय अध्यक्ष करण्यासाठी पक्षाच्या घटनेत बदल करण्याची चर्चा होती. मात्र त्यापूर्वीच त्यांच्यावर पूर्ती या कंपनीच्याबाबत आरोप झाले. गडकरींना पुन्हा अध्यक्षपद मिळू नये, यासाठी भाजपातूनच यासाठी बळ देण्यात आल्याचं मानण्यात येते. गडकरींचे तथाकथित कार्यालय दाखवण्यासाठी भाजपचा मुंबईतील वादग्रस्त नेता आणि ईडीचा हस्तक अशी ज्याची ख्याती आहे, तो नेता पत्रकारांना घेऊन फिरत होता.

2014 मध्ये केंद्रात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (NDA government) सरकार आले तेव्हा नितीन गडकरी यांच्याकडे केंद्रीय परिवहन, रस्ते वाहतूक या विभागांची जबाबदारी देण्यात आली. गेल्या 9 वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी केलेल्या कामांमुळे मोदी सरकारची प्रशंसा देशभरात झाली. तरीही 2019 च्या निवडणुकीनंतर आणि नंतरच्या मंत्रिमंडळ विस्तारातही गड़करींना कमी महत्त्व देण्यात आल्याचे म्हटले जाते. पूर्वीची काही खाती काढून घेण्यात आली.

गडकरींना जाणीवपूर्वक अडकवण्याचा प्रयत्न

कॅगच्या अहवालाद्वारे घोटाळ्यांचा आरोप नितीन गडकरींची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न करण्यात येतोय, असा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला. मात्र, काँग्रेसचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (LoP Vijay Wadettiwar) यांनी शरद पवार यांच्या भेटीनंतर हे विधान केले, हे अधोरेखित करणे भाग आहे. याचे कारण म्हणजे, पवार आणि गडकरी यांचे राजकारणाच्या पलीकडे जावून अत्यंत सुमधुर संबंध आहेत. त्यामुळे अशात वडेट्टीवार यांचा बोलविता धनी शरद पवार तर नाही ना अशी शंका घेण्यास वाव आहे.

गडकरींना पंतप्रधानपदाची संधी मिळेल का?

नितीन गडकरी हे त्यांच्या कामगिरीसाठी प्रसिद्ध असलेल्या देशातील मोजक्या नेत्यांच्या यादीत वरच्या क्रमांकावर आहेत. यापूर्वी यशवंतराव चव्हाण, प्रमोद महाजन, शरद पवार यासारख्या मराठी नेत्यांना दिल्लीत पंतप्रधानाची संधी असल्याचं मानण्यात येत होतं. तशीच आत्ताच्या काळात पंतप्रधानपदाची संधी गडकरींना असल्याचं मानण्यात येतंय. लोकसभेत 272 हा बहुमताचा आकडा आहे. 2019 साली भाजपाला एकट्याला 303 जागा मिळाल्या, तर भाजपा प्रणित एनडीएला 350 जागा मिळाल्या होत्या. यावेळी सर्व विरोधी पक्षांनी “इंडिया” या नावाने एकत्र मोट बांधलेली आहे. एनडीएच्या जागा 100 ने कमी करायच्या, असा त्यांचा प्रयत्न आहे. हे जर खरंच घडलं आणि भाजपाप्रणित एनडीएला 250 वर रोखता आले, तर भाजपाला पुन्हा सत्तेत येण्यासाठी बाहेरुन पाठिंब्याची व्यवस्था करावी लागेल. अशा स्थितीत सर्वपक्षीयांशी चांगले संबंध असलेले नितीन गडकरी हे नरेंद्र मोदी यांच्याऐवजी पंतप्रधानपदाचा पर्याय ठरण्याची शक्यता आहे.

मोदी-शहा आणि गडकरींचे संबंध

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि अमित शाह (Amit Shah) यांची सरकारवर पोलादी पकड असल्याचं सांगण्यात येतं. अशा स्थितीत त्यांच्यासमोर आपली मतं स्पष्टपणे व्यक्त करणारे नितीन गडकरी हे एकमेव मंत्री असल्याचं दिल्लीच्या वर्तुळात सांगण्यात येतं. फोडाफोडीचं आणि सुडाचं राजकारण हे मोदी-शहा या जोडगोळीचं वैशिष्ठ्य मानण्यात येतं. त्याऐवजी विकासाचं आणि बेरजेचं राजकारण हे गडकरींचं वैशिष्ठ्य आहे. त्यामुळेच मोदी-शहा आणि गडकरी यांच्यात विसंवाद नसला तरी सुप्त संघर्ष असल्याची चर्चा आहे. यातूनच गडकरींना भविष्यात मोठी संधी मिळू नये, यासाठी भाजपातूनच अंतर्गत काटशह करण्यात येत असल्याची चर्चा आहे. नितीन गडकरी हे 2014 च्या निवडणुकीनंतर राज्यात मुख्यमंत्रीपदाचे प्रबळ दावेदार होते. गडकरी त्यावेळी मुख्यमंत्री झाले असते, तर आजची परिस्थिती वेगळी असती, असंही अनेक राजकीय भाष्यकार सांगतात.

मुख्यमंत्रीपदी त्यांना संधी मिळाली नसली तरी राष्ट्रीय पातळीवर गडकरींनी त्यांची छाप निर्माण केलेली आहे. अशा स्थितीत आता त्यांना पंतप्रधानपदाची संधी समोर असताना, त्यांची प्रतिमा मलिन करण्याचे प्रयत्न होत असल्याची चर्चा आहे. यातूनच गडकरींनी इंडियात यावे, त्यांना पंतप्रधान करु, अशी ऑफऱ ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी दिलीय.

गडकरींच्या मनात काय?

नितीन गडकरींना यांना 2019 पासून भावी पंतप्रधान म्हणून पाहिले जात असले, तरी 72 वर्षाचे नितीन गडकरी 2024 ची लोकसभा निवडणुका लढणार का, हाच मुळात प्रश्न आहे. गेल्या एक-दोन वर्षांपासून ते सातत्यानं पुढची लोकसभा निवडणूक लढण्यास अनुत्सुक असल्याचं सूचित करत आहेत. राजकारण हे सत्ताकारण झाल्याचं सांगत नुकताच त्यांनी भाजपालाही घरचा आहेर दिलाय. भाजपाचं दुकान जोरात आहे, मात्र त्यात नवे ग्राहकच फार दिसतायेत. जुने नाहीत, असं वक्तव्य त्यांनी केलंय. प्रकृती हेही त्यासाठीचं एक कारण असल्याचं सांगण्यात येतंय. लोकसभा निवडणूक न लढवता सामाजिक कामात अधिक सक्रिय होण्याचे संकेतही त्यांनी यापूर्वी दिलेले आहेत. आता 2024 च्या लोकसभा निवडणुकीत नेमकं काय होणार? गडकरी निवडणूक लढणार का? भाजपाप्रणित एनडीएला किती जागा मिळणार? यावर बऱ्याच प्रश्नांची उत्तरं अवलंबून आहेत. एका मराठी माणसाला पुन्हा पंतप्रधानपदानं हुलकावणी देऊ नये, अशी इच्छा मात्र मराठी माणूस व्यक्त करतोय.

Avatar

Vivek Bhavsar

About Author

विवेक भावसार (Vivek Bhavsar) गेले 30 वर्षे राजकीय आणि शोध पत्रकारिता करत आहेत. त्यांनी नाणार तेल शुद्धीकरण प्रकल्प, समृद्धी महामार्ग, तूर डाळ घोटाळा, एम आय डी सी जमीन हस्तांतरण, कोळसा खाण यासारख्या अनेक घोटाळ्यांचा पर्दाफाश केला आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

राष्ट्रीय

स्वातंत्र्य दिन राजधानीत उत्साहात साजरा

Twitter : @therajkaran नवी दिल्ली 76 वा स्वातंत्र्य दिन राजधानी दिल्लीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी उभय महाराष्ट्र सदनांमध्ये
राष्ट्रीय

लाल किल्ल्यावर फडकणारा तिरंगा कुठे तयार होतो?

Twitter : @therajkaran मुंबई राजधानी दिल्लीतील लाल किल्ल्यावर मोठ्या गौरवाने फडकणारा तिरंगा कुठे तयार केला जातो हे तुम्हाला माहिती आहे