मुंबई
गुजरातच्या जुनागडमध्ये प्रक्षोभक भाषण देणारे मौलाना मुफ्ती सलमान अजहरी यांना गुजरात एटीएसने अटक केली आहे. मौलाना सलमान अजहरी यांना अटक केल्यानंतर पोलीस त्यांना घाटकोपरच्या पोलीस ठाण्यात घेऊन गेले. यानंतर पोलीस ठाण्याच्या बाहेर मौलाना समर्थकांची मोठी गर्दी जमा झाली. पोलिसांनी आता पोलीस ठाण्याच्या बाहेर सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे.
मौलाना मुफ्ती सलमान अजहरी कोण आहेत आणि त्यांना पोलिसांनी अटक का केली, जाणून घेऊया…
मौलाना मुफ्ती सलमान अजहरी कोण आहेत?
मौलाना अजहरी स्वत: इस्लामी रिसर्च स्कॉलर असल्याचं सांगतात. सलमान अजहरी जामिया रियाझुल जन्ना, अल-अमान एज्युकेशन अँड वेलफेअर ट्रस्ट आणि दारुल अमानचे संस्थापक आहेत. त्यांनी कैरो येथील अल अझहर विद्यापीठात शिक्षण घेतले. मौलाना मुफ्ती हे अनेक सामाजिक-धार्मिक कार्यात सक्रिय असतात. त्यांची फॅन फॉलोइंग खूप मोठी आहे. प्रक्षोभक भाषणांमुळे ते अनेकदा चर्चेत आले आहेत. याशिवाय इस्लामिक विद्यार्थ्यांमध्ये ते उपदेश देत असतात.
पोलिसांनी त्यांना ताब्यात का घेतलं?
जुनागडमध्ये, मौलाना मुफ्ती सलमान अझरी यांनी 31 जानेवारीच्या रात्री ‘बी’ डिव्हिजन पोलिस स्टेशनजवळील मोकळ्या मैदानात आयोजित कार्यक्रमात भडकाऊ भाषण केले. भडकाऊ भाषणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अझहरी आणि स्थानिक आयोजक मोहम्मद युसूफ मलिक आणि अझीम हबीब ओडेदरा यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 153B आणि 505 (2) अंतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला. त्यानंतर, मुस्लीम धर्मगुरू मौलाना मुफ्ती सलमान अझरी यांना रविवारी गुजरातच्या जुनागडमध्ये द्वेषयुक्त भाषण पसरवल्याच्या आरोपावरून गुजरात दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) ताब्यात घेतले. मौलानाला मुंबईतील घाटकोपर परिसरातून ताब्यात घेण्यात आले.