Twitter : @NalavadeAnant
मुंबई
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कुणीतरी कोंडून ठेवले असून फडणवीस यांच्या शिवाय दुसरेच कुणीतरी गृहमंत्रालय चालवत आहे, अशी शंका शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी व्यक्त केली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ११ व्या स्मृतीदिनानिमित्त शिवाजी पार्क येथे ठाकरे आणि शिंदे गटात झालेल्या धुमश्चक्रीत ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल झाला असून यासाठीच खा. राऊत यांनी अप्रत्यक्षपणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला.
शिवाजी पार्क येथे शिवसेनेचा ठाकरे गट (Shiv Sena Thackeray) आणि मुख्यमंत्री शिंदे गटांमध्ये मोठा राडा झाला होता. दोन्ही गटांतील कार्यकर्त्यांनी एकमेकांना प्रचंड धक्काबुक्की करत घोषणाबाजी देखील केली. तीन-साडेतीन तास शिवाजी पार्क परिसरात हा गोंधळ चालू होता. याप्रकरणी दोन्ही गटांमधील कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. गुन्हे दाखल केलेल्या कार्यकर्त्यांमध्ये ठाकरे गटाचे कार्यकर्ते अधिक असल्याचं ठाकरे गटातील नेत्यांनी स्पष्ट केले आहे.
यावर खा. राऊत प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले की, आमच्या कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तिथे (शिवतीर्थ) जो काही संघर्ष झाला त्यानंतर तुम्ही आमच्या कार्यकर्त्यांवर विनयभंगाचे खोटे गुन्हे दाखल करत आहात. ही गृहमंत्रालयाची विकृती असून, गृहमंत्र्यांनी या विकृतीवर तोडगा काढला नाही तर काय करायचे ते आम्ही बघू, असा इशारा देत, शिवतीर्थावर गद्दारांना फक्तं रोखण्याचा प्रयत्न नक्कीच झाला. आता तुम्ही त्यांच्यावर विनयभंगाचे गुन्हे दाखल करून तुमची विकृती उघड केली आहे. तुम्ही कितीही गुन्हे दाखल केले तरी आमचा संघर्ष चालूच राहील, असाही गर्भित इशारा खा. राऊत यांनी दिला.
गद्दरांच्या विरोधात आमची लढाई न्यायलयात आणि रस्त्यावरही संघर्ष चालू राहील. बेईमान गटातील महिलांची भाषा आणि भूमिका पाहा, त्यांच्यावर तुम्ही काय कारवाई केली ते सांगा. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज्याचे गृहमंत्री आहेत की नाही? की त्यांना कोंडून ठेवून दुसरेच कोणीतरी राज्य करत आहे, असा सवाल करत खा. राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर थेट निशाणा साधला.