नवी दिल्ली
संसदेवरील हल्ल्याला आजच 22 वर्षे पूर्ण झाली आहेत. आणि आजच लोकसभेत घुसखोरी झाली. यादरम्यान दोघांना ताब्यात घेण्यात आलं आहे. या दोघांमध्ये एक महिला आहे आणि दुसरा पुरुष. महिला हरियाणातील हिसार या भागातील असून तिचं नाव निलम आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, महिलेने संसदेच्या बाहेर गोंधळ घातला होता. बुधवारी संसदेचं कामकाज सुरू होतं. या दरम्यान प्रेक्षक गॅलरीत काही जणं बसले होते. यातील दोघेजण उठले आणि गॅलरीतून खासदाराच्या बाकांवर उडी मारली. यादरम्यान एका व्यक्तीने शूज काढले आणि लोकसभेत स्प्रे केला. यानंतर सर्वत्र पिवळ्या रंगाचा धूर पसरला. यानंतर संसदेच्या बाहेरही पिवळ्या रंगाचा स्प्रे करण्यात आला. एक पुरुष आणि महिलेने संसदेत गोंधळ घातला. त्या दोघांना पकडण्यात आलं असून त्यांची चौकशी केली जात आहे.
ही महिला संसदेच्या बाहेर घोषणाबाजी करीत असल्याचं व्हिडीओतून दिसून येत आहे. हुकूमशाही बंद करा अशा प्रकारच्या घोषणा ही महिला करीत आहे.
अचानक झालेल्या या घटनेनंतर लोकसभेत गोंधळ उडाला. यादरम्यान पंजाबचे खासदार औजला यांनी व्यक्तीकडून स्प्रे खेचून घेतला. या घटनेनंतर खासदारांच्या सुरक्षेवर सवाल उपस्थित केले जात आहे. विशेष म्हणजे आरोपींकडे जे पास मिळाले आहेत, ते भाजप खासदाराच्या कार्यालयातून दिले गेले आहेत.