By विवेक भावसार
X : @vivekbhavsar
राज्याचे पोलिस महासंचालक रजनीश सेठ येत्या रविवारी म्हणजे ३१ डिसेंबर रोजी सेवा निवृत्त होत आहेत. त्यांच्या जागी कोणाची नियुक्ती करायची याचा निर्णय आज होणाऱ्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या बैठकीत घेतला जाण्याची शक्यता आहे. एकेकाळी विद्यमान गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विश्वासू समजल्या जाणाऱ्या आणि सध्या केंद्रात प्रतिनियुक्तीवर असलेल्या रश्मी शुक्ला या पोलीस महासंचालक होऊ शकतील. मात्र, दिल्लीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याने शुक्ला यांनी फडणवीस यांची नाराजी ओढवून घेतली आहे. स्वतः शिंदे आणि दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार देखील शुक्ला यांना पोलीस महासंचालक करण्यास उत्सुक नाहीत. त्यामुळे नवे पोलीस महासचालक कोण असतील ही उत्सुकता किमान संध्याकाळपर्यंत किंवा उद्या २९ डिसेंबर पर्यंत कायम राहणार आहे.
२०२४ हे निवडणूक वर्ष आहे. अशा वेळी सत्ताधारी पक्षाला आपल्या मर्जीतील पोलीस अधिकारी राज्यात आणि प्रमुख शहरात असावे असे वाटणे साहजिक आहे. म्हणूनच जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात राज्यात मोठ्या प्रमाणात बदल्या केल्या जातील. यात राज्याच्या पोलिस महासंचालक पासून ते विशेष पोलीस महानिरीक्षक आणि जिल्हा पोलिस अधीक्षक यांचा समावेश आहे. या घाऊक बदल्या असतील.
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात काल बैठक झाली. या बैठकीत या पोलिसांच्या बदल्यासंदर्भात चर्चा झाली असावी अशी शक्यता आहे. रजनीश सेठ यांच्या जागी त्यांच्याच बॅचचे जयजित सिंह यांचा विचार केला गेला असता. मात्र, त्यांच्याकडे सहा महिने शिल्लक असल्याने त्यांना पोलीस महासंचालक होता येत नाही.
हे ही वाचा- सर्वाधिक परकीय गुंतवणूक महाराष्ट्रात, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिला पुरावा!
या परिस्थितीत केंद्रीय प्रतिनियुक्तीवर असलेल्या रश्मि शुक्ला यांचाही विचार केला जाऊ शकेल. पण शुक्ला यांना पोलीस महासंचालकपदापेक्षा मुंबईचे पोलीस आयुक्त होण्यात जास्त रुची आहे. त्यासाठी त्या प्रयत्नशील आहेत. अशा वेळी मुंबईचे सध्याचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांना पोलीस महासंचालक केले जाऊ शकेल. मात्र, सेवा ज्येष्ठतेनुसार एक वर्ष जुनिअर असेलेले फणसळकर पोलीस महासंचालक होतील ते ही तांत्रिक दृष्टीने योग्य होणार नाही.
१९८८ बॅच सोडली तर नंतरच्या १९८९ चा बॅचचे दोन अधिकारी अर्थात विवेक फणसळकर आणी प्रज्ञा सरवदे या दोन नावाची शक्यता आहे. कारण सरवदे यांच्याकडेही शुक्ला यांच्या इतकाच सहा महिन्याचा कालावधी आहे.
शुक्ला महाराष्ट्रात परतल्या नाहीत तर विवेक फणसळकर यांना पोलीस महासंचालक करून आणि मुंबई पोलीस आयुक्तपद पुन्हा अप्पर पोलीस महासंचालक दर्जाचे केले तर सध्याचे विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती यांच्या गळ्यात पोलीस आयुक्त पदाची माळ पडू शकेल. कारण १९९९ बॅच चे दोन अधिकारी शिरिष जैन आणि दिपक पांडेय यांना पद्दोन्नती देऊन अप्पर पोलीस महासंचालकचा दर्जा येत्या काही दिवसात दिला जाईल.
आशुतोष डुंबरे हे ठाणे पोलीस आयुक्त झाल्यानंतर राज्य गुप्त वार्ता विभागाचे आयुक्त कोण होणार याचीही उत्सुकता आहे. या पदासाठी सेवाज्येष्ठता असलेला आणि सरकारच्या विश्वासातील अधिकारीच हवा असतो. अशा वेळी नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना राज्यगुप्त वार्ता विभागाचे आयुक्त केले जावू शकेल.
नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलिॅद भारंबे यांनी काही खाजगी कामासाठी तीन महिने सुट्टी मागितली आहे. अशा वेळी नवी मुंबईला नवे पोलीस आयुक्त द्यावा लागेल. नवी मुंबई पोलीस आयुक्त म्हणून प्रशांत बुरुडे किंवा निकेत कौशिक यांचा नंबर लागू शकतो.
पुणे पोलीस आयुक्त रितेश कुमार यांचीही पदोन्नती आहे. त्यामुळे त्यांना पदोन्नती दिली तर त्यांच्या जागी पिंपरी – चिंचवडचे पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांची निवड केले जाण्याची दाट शक्यता आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर शहरात आयुक्त म्हणून संजय सक्सेना किंवा संजीव सिंघल यांची वर्णी लागू शकेल.
त्यासोबत अनेक परिक्षेत्रातील आयजी ही बदलले जावू शकतात. त्यात नाशिकचे आयजी बीजी शेखर त्यांचे पद कायम ठेवण्यासाठी आटापिटा करतांना दिसते आहे.
अमरावतीचे आयजी जयंत नाईकनवरे या महिन्यात सेवानिवृत्त होत आहेत. त्यांच्या जागी नवे आयजी दिले जावू शकतात.
नागपूर परिक्षेत्राचे आयजी चेरिंग दोरजे यांना मुंबईला जाण्याचे वेध लागले आहेत. त्यामुळे दोरजे ही नागपूरच्या बाहेर जातील. सध्या नागपूरमध्ये चर्चा आहे की नागपूरचे पोलीस आयुक्त निवडणुकीपर्यंत कायम रहातील. पण राममंदिर कार्यक्रमानंतर जर निवडणुक लागल्या तर अमितेश कुमार यांची तशीही बदली करावी लागेल.
तसेच २००६ बॅचमधील अनेक अधिकाऱ्यांची पद्दोन्नती होऊन आयजी होतील. त्यापैकी तीन अधिकारी मुंबईत अतिरिक्त पोलीस आयुक्त पदावर आहेत. आरती सिंह, चंद्रकिशोर मीणा आणि विरेंद्र मिश्रा हे ते अधिकारी आहेत. अशा वेळी २०१० बॅचच्या अशा अधिकाऱ्यांचा ज्यांची अप्पर पोलीस आयुक्त पदावर पदोन्नती होईल, अशांचा विचार होऊ शकतो. तसेच अनेक जिल्ह्यातील पोलीस अधिक्षक देखील बदलले जातील.
२०१६ बॅचचे अधिकारी नियुक्तीसाठी पात्र असतांना २०१७ च्या बॅचचे अधिकारी असलेले अनुज तारे यांना वाशिमचे पोलीस अधिक्षक केले गेले. पण अतिशय प्रामाणिकपणे काम करणारे मुमुक्का सुदर्शन यांना अजून ही डिसीपी ठेवले आहे. खरं तर त्यांचे नाव चंद्रपूरसाठी सुरू होते, पण नंतर ते मागे पडले.
सातारा पोलीस अधिक्षक समीर शेख यांच्या कामावर गृहमंत्री फारसे खुश नसल्याचे ही सुत्रांनी सांगितले आहे. जानेवारी महिन्यात या सगळ्या बदल्या अपेक्षित आहेत.
प्रभात कुमार, विनीत अगरवाल, सुरेश मेखला, रविंद्र सिंगल यांना सध्या तरी आहे त्याच ठिकाणी काम करावे लागेल, असे दिसते आहे.