X : @vivekbhavsar
मुंबई – भारतीय जनता पक्षाच्या (BJP) राज्यातील आणि केंद्रातील नेतृत्वाने महाराष्ट्रातील उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) सरकार पाडण्यासाठी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याकरवी शिवसेनेत बंड घडवून आणले, शिंदे यांनी 40 आमदार आणि 15 खासदार, शेकडोच्या संख्येने नगरसेवक यांना सोबत घेऊन भाजपसोबत सरकार स्थापन केले, स्वत: मुख्यमंत्री झाले, शिवसेना हे पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण हे पक्ष चिन्ह पळवले, तरीही मुंबईकरांनी लोकसभा निवडणूक निकालातून दाखवून दिले की मुंबई ही निष्ठावंत शिवसैनिकांचीच (Shivsaniks) आहे. मुंबईतील सहा पैकी उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Balasaheb Tha ckeray) शिवसेनेचे तीन आणि त्यांची सहयोगी पक्ष कॉँग्रेसची (Congress) एक उमेदवार अशा चार जागा जिंकून भाजपला धूळ चारली आहे. भाजपचे एकमेव उमेदवार पीयूष गोयल (Piyush Goyal) हे उत्तर मुंबईतून निवडून आले आहेत. गोयल यांनी कॉँग्रेसचे भूषण पाटील यांचा पराभव केला आहे.
दक्षिण मुंबईतून उद्धव सेनेचे अरविंद सावंत (MP Arvind Sawant) सलग तिसऱ्यांदा निवडून आले आहे. सावंत यांच्या समोर त्यांच्याच पक्षातील जुन्या सहकारी आणि पक्ष फुटीनंतर एकनाथ शिंदे यांच्या समवेत गेलेल्या आमदार यामिनी जाधव (MLA Yamini Jadhav) निवडणुकीत उभ्या होत्या. जाधव या मुस्लिम (Muslim), मराठी (Marathi) आणि गुजराथी (Gujrati), जैन (Jain) समाजाच्या मतांवर निवडून येतील असा दावा केला जात होता.
दरबारी नेता असा शिक्का बसलेले आणि मतदारांशी थेट संपर्क नसलेले मात्र उद्धव ठाकरे यांच्या वेगवेगळ्या संघटनेची प्रशासकीय घडी बसवणारे अनिल देसाई (Anil Desai) हे उत्तर मध्य मुंबईतून निवडून आले आहेत. त्यांच्या समोर शिवसेनेचे (शिंदे) मावळते खासदार राहुल शेवाळे (MP Rahul Shewale) उभे होते. देसाई यांना मराठी मतांसह मुस्लिम, ख्रिश्चन, दलित आणि तमिळ समाजाची मिळाली असे सांगितले जात आहे.
मुंबई उत्तर पूर्व मतदारसंघातून उद्धव सेनेचे संजय दिना पाटील (Sanjay Dina Patil) यांनी भाजपचे मिहिर कोटेचा (Mihir Kotecha) यांचा पराभव केला आहे. गुजराती आणि जैन समाजाचे एकगठ्ठा मतदान मिहिर यांना झाल्याचे सांगितले जाते. भाजपचे संघटन कौशल्य वापरले गेले, गुजरातीबहुल परिसरात इमारतीतून गुजराती मतदारांना बाहेर काढणे आणि त्यांना मतदान केंद्रपर्यंत पोहचवण्याची जबाबदारी भाजपच्या बूथ कार्यकर्त्यांवर सोपविण्यात आली होती. त्या तुलनेत असंख्य कोंकणी मतदारांनी (Konkani voters) आधीच कोकणात जाण्याचे नियोजन केले असल्याने आणि त्यातील अनेक मतदार कोकणात गेले असतांनाही उर्वरित मराठी, दलित आणि मुस्लिम समाजाच्या बळावर संजय दिन पाटील निवडून आले आहेत. स्वर्गीय दिना पाटील यांचे या मतदारसंघातील काम या बळावर उद्धव सेनेला ही जागा जिंकता आली आहे.
मुंबई उत्तर मध्य मतदारसंघातून कॉँग्रेसच्या वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) निवडून आल्या आहेत. त्यांच्या समोर भाजपने विधीज्ञ उज्ज्वल निकम (Adv Ujjawal Nikam) यांना उमेदवारी देण्यात आली होती. कॉँग्रेस आणि उद्धव सेनेच्या कार्यकर्त्यांनी हातात हात घालून काम केले आणि एकमेकाचे मते ट्रान्सफर केल्याने वर्षा गायकवाड आणि त्यांच्या गृह मतदारसंघातून उद्धव सेनेचे अनिल देसाई निवडून आले आहेत.
मुंबई उत्तर पश्चिम मधून आधी उद्धव सेनेचे अमोल किर्तीकर (Amol Kirtikar) 681 मतांच्या फरकाने निवडून आल्याचे जाहीर करण्यात आले होते. मात्र पराभूत उमेदवार शिवसेनेचे रवींद्र वायकर (Ravindra Waikar) यांनी फेर मतमोजणीची मागणी केली आणि यात वायकर हे 48 मतांनी निवडून आल्याचे जाहीर करण्यात आले. ही बातमी प्रसिद्ध झाली तेव्हा वायकर यांचा तसेच या मतदारसंघातील निकाल केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहिर केलेला नव्हता.
मतदानाची आकडेवारी निवडणूक आयोगाच्या अधिकृत संकेत स्थळावरून घेतल्या आहेत, मात्र, आयोगाकडून अंतिम निकल जाहीर झालेला नव्हता.
मुंबई दक्षिण मध्य
अनिल देसाई (उद्धव सेना) – विजयी : 395138 मते मिळाली
राहुल शेवाळे (शिवसेना) – पराभूत – 341754 मते मिळाली
मतातील फरक :
दक्षिण मुंबई
अरविंद सावंत (उद्धव सेना) – विजयी : 395655
यामिनी जाधव (शिवसेना) – पराभूत : 342982
मुंबई उत्तर पूर्व
संजय दिन पाटील (उद्धव सेना) – विजयी – 448604
मिहिर कोटेचा (भाजप) – पराभूत : 419589
मुंबई उत्तर मध्य
वर्षा गायकवाड (कॉँग्रेस) – विजयी – 444098
उज्ज्वल निकम (भाजप) – पराभूत : 427387
मुंबईत उत्तर पश्चिम
रवींद्र वायकर (शिवसेना) – विजयी : 447159
अमोल किर्तीकर (उद्धव सेना) – पराभूत : 446648
उत्तर मुंबई
पीयूष गोयल (भाजप) – विजयी : 673828
भूषण पाटील (कॉँग्रेस) – पराभूत : 320572