मुंबई : लोकसभा निवडणुकीचे सहा टप्पे पार पडल्यानंतर आता शेवटच्या सातव्या टप्प्यात उद्या मतदान होत आहे . देशातील राजकीय परिस्थिती स्पष्ट झाली आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश (Jairam Ramesh )यांनी आमचं सरकार येणार आहे. आम्हाला स्पष्ट आणि निर्णायक बहुमत मिळणार आहे, असा दावा केला आहे . तसेच या निवडणुकीत इंडिया आघाडीला( india aaghadi ) संपूर्ण बहुमत मिळाल्यास 48 तासातच पंतप्रधानाची निवड केली जाईल, असंही त्यांनी म्हटलं आहे .
तसेच पंतप्रधान निवडण्याचा फॉर्म्युलाही त्यांनी स्पष्ट केला आहे . तसेच इंडिया आघाडीची सत्ता आल्यास एनडीएचे मित्र पक्ष आमच्या आघाडीत येऊ शकतात. मात्र, त्यांना आघाडीत घ्यायचं की नाही याचा निर्णय काँग्रेस हायकमाड घेईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं. यावेळी त्यांना नीतीश कुमार आणि टीडीपी अध्यक्ष चंद्राबाबू नायडू यांच्यासाठी इंडिया आघाडीचे दरवाजे उघडे असतील का? असा सवाल करण्यात आला. त्यावरही त्यांनी उत्तर दिलं. नीतीश कुमार हे पलटी मारण्यात माहीर आहेत. चंद्राबाबू 2019मध्ये काँग्रेस आघाडीत होते, असं जयराम रमेश म्हणाले आहेत . येत्या 1 जून रोजी सातव्या टप्प्यासाठी मतदान होत आहे. त्यानंतर 4 जून रोजी लोकसभा निवडणुकीचे निकाल लागणार आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांनी या निवडणुकीत इंडिया आघाडीला 272 पेक्षा अधिक जागा मिळणार असल्याचंही स्पष्ट केलं आहे .
छत्तीसगड, आसाम आणि मध्यप्रदेशात आमच्या कामगिरीत सुधारणा होणार आहे. एकूण पाहता आम्ही 20 वर्षानंतर 2004 सारख्या परिस्थितीकडे जात आहोत. उत्तर प्रदेशात आम्हाला फायदा होणार आहे. भाजपला 2019मध्ये 62 जागा मिळाल्या होत्या. त्यात त्यांची सुधारणा होणार नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे . तसेच इंडिया आणि एनडीएमध्ये दोन ‘आय’चं अंतर आहे. आय फॉर इन्सानियत आणि आय फॉर इमानदारी. ज्या पक्षांमध्ये इन्सानियत आणि इमानदारी आहे, पण ते एनडीएमध्ये आहेत, असे पक्ष इंडिया आघाडीत येऊ शकतात. जनादेशानंतर होणारं सरकार हे हुकूमशाहचं राहणार नसून जनतेचं सरकार असेल, असेही त्यांनी सांगितलं आहे .