मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्यातील प्रचारतोफा आज थंडावणार आहेत. देशभरातील दोन महिन्याचा प्रचार संपल्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi ) आजपासून तब्बल 45 तास कन्याकुमारी येथील विवेकानंद रॉक मेमोरियल याठिकाणी (Vivekanand Rock) ध्यानधारणा (Meditation)करणार आहेत . त्यांच्या ध्यानधारणेदरम्यान समुद्रकिनारी लोकांना प्रवेश बंदी करण्यात आली असून सुमारे 2,000 पोलीस कर्मचारी आणि सुरक्षा यंत्रणा तैनात करण्यात आली आहे.
विवेकानंद शिलास्मारकला जाण्यापूर्वी त्यांनी येथील भगवती अम्मन मंदिरात पूजन केलं आहे . यावेळी मंदिरातील पुजाऱ्यांनी पारंपरिक पद्धतीनं पंतप्रधान मोदींचं स्वागत केलं. त्यानंतर विशेष बोटीनं ते विवेकानंद शिलास्मारकावर पोहोचले. इथं पंतप्रधान मोदींनी स्वामी विवेकानंद यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर काही काळ विश्रांती घेऊन ते ध्यानाला बसले. स्वामी विवेकानंद ज्या ठिकाणी ध्यानाला बसले होते, त्या ठिकाणी पंतप्रधान मोदी सुमारे दोन दिवस ध्यानधारणा करणार आहेत. 1 जूनला त्यांचं मौनव्रत पूर्ण होणार असून त्यानंतर ते राजधानी दिल्लीला रवाना होणार आहेत . आता त्यांच्या
ध्यानधारणेवरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी टीका केली आहे. नरेंद्र मोदींनी आपण एकत्र चर्चेसाठी आवाहन केलं होतं मात्र ते आले नाहीत. आता चर्चा शक्य नाही कारण ते मौनव्रतात गेल्याचं म्हणत, चिमटा काढला आहे.
लोकसभेसाठी देशभरात मोर्चे, सभा, रोड शोंमुळे निवडणुकांचा माहोल होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी, राहुल गांधी, प्रियंका गांधी यांच्यासह देशातील महत्त्वाच्या नेत्यांनी प्रचारात वाहून घेतलं होतं. ममता बॅनर्जी यांनी कोलकाता येथे 8 किलोमीटर लांब पदयात्रा काढली. नरेंद्र मोदींची आज पंजाबमधील होशियारपूर येथे शेवटची सभा झाली त्यानंतर ते कन्याकुमारीला रवाना झाले. दरम्यान ७५ दिवसांच्या प्रचाराच्या तोफा अखेर थंडावल्या असून आता ४ तारखेच्या निकालाकडे लक्ष लागलं आहे.