मुंबई :लोकसभा निवडणुकीचा अंतिम टप्पा आला असून सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराचा आज धडाका लावला आहे . उद्या सातव्या टप्प्यातील मतदान होणार असून आज प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत .आता या निवडणुकीनंतर विधानपरिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली पुन्हा एकदा महायुती (mahayuti) व महाविकास आघाडीत (mva )आरोप प्रत्यारोप होत आहेत .अशातच आता भाजपला बिनशर्त पाठींबा देणाऱ्या मनसेने (mns )विधानपरिषद निवडणुकीसाठी कोकण पदवीधर मतदारसंघातून अभिजित पानसे यांना उमेदवारी जाहीर केल्यामुळे महायुतीत पुन्हा वादंग होणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागले असताना आता मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार (Ashish Shelar)यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची भेट घेतली आहे. या भेटीत कोकण आणि मुंबई पदवीधर मतदारसंघाबाबत चर्चा झाली असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे, कोकण पदवीधर मतदारसंघासाठी महायुतीचा उमेदवार नेमका कोणाचा असेल, याची चर्चा रंगली आहे.
लोकसभेनंतर आता विधानपरिषदेच्या 4 जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून 26 जून रोजी मतदान होत आहे. त्यामुळे, महायुती व महाविकास आघाडीतील सर्वच पक्ष निवडणुकीसाठी कामाला लागले आहेत. त्यातच, मनसेनं अभिजीत पानसे यांना कोकण पदवीधर मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसनेही (अजित पवार) मुंबई शिक्षक मतदारसंघात शिवाजी नलावडे यांच्या नावाची घोषणा केली आहे. मनसेनं उमेदवाराची घोषणा केल्यानंतर, आता भाजप काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. कारण कोकण पदवीधर हा भाजपचा पारंपारिक मतदारसंघ समजला जातो आणि याच मतदारसंघात निरंजन डावखरे हे भाजपचे विद्यमान आमदार आहेत. त्यामुळे राज ठाकरेंनी अचानक पानसेंचं नाव जाहीर करून भाजपच्या अडचणीत वाढ केली आहे . आता महायुती याला पाठींबा देणार कि नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले असताना आशिष शेलार यांनी राज ठाकरे यांची भेट घेतल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.
दरम्यान मनसेला भाजपच्या पाठींब्याची अपेक्षा होती कारण अभिजीत पानसे यांनी उमेदवारी जाहीर केल्यानंतर मनसेच्या अविनाश जाधव यांनी भाजपने मनसेलापाठिंबा द्यावा अशी इच्छा बोलून दाखवली होती. हिंदुत्त्वासाठी लोकसभा निवडणुकीत, विधानसभा निवडणुकीत, महापालिका निवडणुकीत बिनशर्त पाठिंबा द्यायचा, असा पक्ष चालत असतो का?, असा उपरोधात्मक टोलाही जाधव यांनी भाजपला दिला होता. त्यामुळे, कोकण पदवीधर मतदारसंघात भाजप महायुतीचा उमेदवार असणार की नाही, हे पुढील काही दिवसांतच स्पष्ट होणार आहे .