ताज्या बातम्या महाराष्ट्र

मनसेच्या राजू पाटलांसाठी दिल्ली बहोत दूर; आमदारकी टिकवणे अवघड?

By Vivek Bhavsar

X: @vivekbhavsar

मुंबई

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्या कल्याण लोकसभा मतदारसंघात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार राजू पाटील (MNS MLA Raju Patil) आव्हान उभे करतील अशी चर्चा रंगवली जात आहे. प्रत्यक्षात राजू पाटील यांना लोकसभा निवडणूक जिंकणे तर अशक्यच होणार आहे, मात्र, आमदारकीदेखील टिकवणे अवघड जाणार असल्याचा दावा मनसेचे स्थानिक आजी – माजी पदाधिकारी  करत आहेत. 

मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (MNS chief Raj Thackeray met CM Eknath Shinde) यांची काही दिवसापूर्वी भेट घेतली होती. त्यानंतर कल्याणची जागा मनसेला सोडणार का? राजू पाटील लोकसभा निवडणूक लढणार का? अशा चर्चा रंगवल्या गेल्या. मात्र, राजू पाटील यांच्या विधानसभा मतदारसंघात शिंदे यांच्या शिवसेनेने मदत करावी आणि हा मतदारसंघ मनसेकडेच ठेवावा, अशी विनंती राज ठाकरे यांनी या बैठकीत केल्याची माहिती सेनेतील सूत्रांनी दिली. 

राजू पाटील यांच्या कार्यपद्धतीवर कल्याण –  डोंबिवली (Kalyan – Dombivli) विभागातील मनसे पदाधिकारी नाराज आहेत. गेल्या काही वर्षात राजू पाटील यांना पक्षाची ताकद वाढवता आलेली नाही. प्रत्येक शहरातील स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्ये राजू पाटील यांच्यासह वरिष्ठांच्या बाबतीत नाराजी आहे. राजू पाटील मोजक्याच पदाधिकाऱ्यांना वेळ देतात, मोजक्याच लोकांना भेटतात, कार्यकारिणीमध्ये पक्षपातीपणा करतात, असा आरोप केला जातो.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (Maharashtra Navnirman Sena) स्थानिक कार्यकारिणीतील अंतर्गत गटबाजी थेट पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांच्या समोरच उघड झाली होती. राज ठाकरे यांचा बदलापूर (Badlapur), अंबरनाथ (Ambernath) आणि उल्हासनगर (Ulhasnagar) दौरा मुळात याचसाठी गाजला होता. त्यामुळे ठाकरे यांनी कार्यकारिणी सुद्धा बरखास्त केली होती.

त्यानंतर मोठ्या कालावधीनंतर नवीन कार्यकारिणी जाहीर झाली खरी. मात्र, त्यातही अनेक पदाधिकारी असे आहेत ज्यांनी कधी पक्षासाठी काम केलेले नाही. त्यामुळे पुन्हा नाराजी वाढली असून यातून अनेक पदाधिकारी बंडाच्या तयारीत आहेत. खुद्द पाटील यांचे निवासस्थान असलेल्या भागात मनसेचे माजी नगरसेवक आणि महत्वाचे पदाधिकारी यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत (Shinde Sena) प्रवेश केला आहे. राजेश कदम, सागर जेधे, शरद गंभीरराव अशा पदाधिकाऱ्यांचा त्यात समावेश आहे. त्यामुळे मनसेकडे आता काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांची वानवा आहे. 

डोंबिवली आणि कल्याण ग्रामीण भागावर एकेकाळी राजू पाटील यांचे वर्चस्व होते. राजू पाटील सांगतील ती पूर्व दिशा, ते सांगतील तेव्हा आंदोलने, असा त्यांचा दबदबा होता. मात्र, या परिसरातील अनेक महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांनी गेल्या काही वर्षात मनसेची साथ सोडून शिवसेनेत प्रवेश केल्याने राजू पाटील यांचा दबदबा संपुष्टात आला आहे.

दुसरीकडे खासदार डॉ श्रीकांत शिंदे (MP Dr Shrikant Shinde) यांच्या विरोधात स्थानिक भाजपचे नेते खास करून मंत्री रवींद्र चव्हाण (Minister Ravindra Chavan), गणपत गायकवाड आदि नाराज असले आणि डॉ शिंदे यांना पराभूत करू अशा वल्गना केल्या जात असल्या, तरीही स्थानिक नागरिक आणि मतदार मात्र डॉ शिंदे यांच्या कामावर प्रचंड खुश आहेत. त्यामुळे डॉ शिंदे यांना भाजप (BJP) किंवा मनसेचे राजू पाटील यांच्या माध्यमातून आव्हान उभे राहील, या चर्चांमध्ये तथ्य नसल्याचे मनसे नेते खाजगीत मान्य करतात. 

कल्याण लोकसभा मतदारसंघात (Kalyan Lok Sabha constituency) गेल्या काही वर्षात खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून अनेक प्रकल्प सुरू आहेत, तर काही पूर्णत्वास लागले आहेत. मात्र शिळफाटा वाहतूक कोंडी असो की कल्याण – शीळ रस्त्याचा प्रश्न असो, या प्रश्नावर राजू पाटील फक्त ट्विट करताना दिसतात. त्याचवेळी खासदार डॉ श्रीकांत शिंदे कामाचा आढावा घेताना, बैठका घेताना दिसतात. त्यामुळे नागरिकांमध्ये पाटील यांची प्रतिमा फक्त ट्विटर आमदार अशी झाली आहे. 

शीळ फाटा येथे गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात गृहनिर्माण प्रकल्प उभे राहिले आहेत. या वसाहतींचे अनेक प्रश्न मार्गी लावण्यात डॉ श्रीकांत शिंदे यांनी पुढाकार घेतला आहे. पलावा वसाहतीचा (Palava city) मालमत्ता कराचा मोठा प्रश्न खासदार डॉ शिंदे यांच्या पुढाकाराने मार्गी लागला. त्यात पलावा वसाहतीला थेट ६६ टक्के कर माफी मिळाली. त्यामुळे पलावावासियांमध्ये डॉ श्रीकांत शिंदे आणि शिवसेनेबद्दल आपुलकी आहे. त्यामुळे पलावासारखी मोठी वसाहत राजू पाटील यांच्या हातून निघून गेल्याची दावा केला जात आहे. 

राजू पाटील यांना आमदार म्हणून छाप पाडता येईल अशी कामे करण्यात यश आलेले नाही. पाटील यांच्याकडे दाखवण्यासाठी कामेही नाहीत. उलट खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी मोठी कामे मार्गी लावली. त्यामुळे राजू पाटील हे लोकसभेचे उमेदवार जरी झाले तरी डॉ श्रीकांत शिंदे यांच्यापुढे त्यांचा निभाव लागले कठीण असेल, असे मनसेचे पदाधिकारी खाजगीत बोलून दाखवत आहेत. 

राजू पाटील यांच्यासाठी दिल्ली अब बहोत दूर है आमदारकी टिकवली तरी खूप झाले, अशी प्रतिक्रिया मनसेच्या एका पदाधिकाऱ्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर व्यक्त केली.

Avatar

Vivek Bhavsar

About Author

विवेक भावसार (Vivek Bhavsar) गेले 30 वर्षे राजकीय आणि शोध पत्रकारिता करत आहेत. त्यांनी नाणार तेल शुद्धीकरण प्रकल्प, समृद्धी महामार्ग, तूर डाळ घोटाळा, एम आय डी सी जमीन हस्तांतरण, कोळसा खाण यासारख्या अनेक घोटाळ्यांचा पर्दाफाश केला आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात