नागपूर – मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) स्थानक प्रांगणात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारण्यात येणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत केली. ही घोषणा होताच सभागृहात सदस्यांनी बाके वाजवून जोरदार स्वागत केले आणि “छत्रपती शिवाजी महाराज की जय”, “जय भवानी जय शिवाजी” असा जयघोष केला.
उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी मागील अधिवेशनात CSMT परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याची मागणी केली होती. त्यावर बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, लोकसभेत राज्य मंत्र्यांनी दिलेले उत्तर जुना आराखडा ध्यानात घेऊन होते. आता रेल्वे मंत्र्यांशी सविस्तर चर्चा झाली असून विषयात लक्षणीय प्रगती झाली आहे. रेल्वे मंत्र्यांनी स्वतः भव्य पुतळ्याचा प्रस्ताव आणि सादरीकरण दाखवून माहिती दिली आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, नव्या आराखड्यानुसार शिवरायांचा भव्य आणि प्रतिष्ठापूर्ण पुतळा उभारण्यात येणार आहे. सध्या या नव्या आराखड्याला अंतिम मान्यता मिळवण्याची प्रक्रिया सुरू आहे.