X : @NalawadeAnant
मुंबई: काँग्रेस सत्तेत येताच, लाडकी बहिण योजना बंद करण्याचे विधान करणाऱ्या कॉंग्रेस नेत्यांविरोधात शिवसेनेच्या महिला आघाडीने आज आक्रमक भूमिका घेतली. नरिमन पॉंईंट येथील पक्ष कार्यालय बाळासाहेब भवनसमोर गुरूवारी जोरदार घोषणाबाजी करत काँग्रेस नेत्यांच्या कटआऊटला जोडे मारो आंदोलन केले. कॉंग्रेस कार्यालयावर मोर्चा नेणाऱ्या आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
महायुती सरकारने विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी राज्यात मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना राबवायला सुरुवात केल्याने या योजनेची राज्यभरात सर्वत्र चर्चा सुरू आहे. योजनेला चांगला प्रतिसादही मिळतो आहे. त्यामुळेच विरोधकांकडून विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर केवळ मतांसाठी ही योजना आणल्याचा जोरदार अपप्रचार होत आहे.
आघाडीचे सरकार सत्तेत आल्यास ही योजना बंद करू, असे विधान माजी मंत्री आणि काँग्रेस नेते सुनील केदार यांनी काही दिवसांपूर्वी केले होते. त्यामुळे केदार यांच्या वक्तव्याचे तीव्र पडसाद राज्यभरात उमटले. त्याचीच परिणती म्हणून महायुतीमधील तिन्ही पक्षाकडून काँग्रेस आणि केदार यांच्या विरोधात ठिकठिकाणी आंदोलन केले जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून गुरुवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या महिला आघाडीने काँग्रेस विरोधात जोडे मारो आंदोलन केले.
त्याचवेळी बाळासाहेब भवन ते काँग्रेस कार्यालयापर्यंत आंदोलन जात असताना, मध्येच पोलिसांनी आंदोलन थांबवत आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यामुळे काही काळ या परिसरात तणावाचे वातावरण होते. आंदोलनात माजी आ. मनीषा कायंदे, आ. यामिनी जाधव, प्रवक्त्या शितल म्हात्रे आदींसह आघाडीतल्या अनेक महिला आंदोलनात सहभागी झाल्या होत्या.
महिला विरोधी काँग्रेसची भूमिका
काँग्रेसची भूमिका नेहमीच महिला विरोधी राहिली आहे. त्यांचे नेते राहुल गांधी हे परदेशात जाऊन आपल्या देशाची बदनामी करत आहेत. तर दुसरीकडे कॉंग्रेसचे नेते राज्यातील मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवर टीका करत असून बंद करण्याची भाषा करत आहेत. मात्र महिलांच्या दृष्टीने ही योजना खूप महत्त्वाची आहे. दीड हजारांतही अनेक महिलांना संसारात आर्थिक मदत होत आहे. त्यामुळे आम्ही सर्व कॉंगेस नेत्यांच्या या विधानांचा तीव्र शब्दात याचा निषेध करतो, अशी प्रतिक्रिया शिवसेना प्रवक्त्या, माजी आ. मनीषा कायंदे यांनी यावेळी दिली.
यावेळी आंदोलनकर्त्यांनी केदार यांचे मोठे पोस्टर हाती घेत त्यांना जोडो मारो आंदोलन केले. मिळून साऱ्या बहिणी… काँग्रेसला बाजू पाणी, लाडक्या बहिणींचे केदारला पोटदुखी, बँक घोटाळ्याचा आरोपी सुनील केदार मुर्दाबाद… केदारचे करायचे काय खाली डोक वर पाय… अशा घोषणाबाजी देत, महिला कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला.यावेळी मोठ्या प्रमाणात पोलीस फौजफाटा यावेळी तैनात होता.