जळगाव : रक्षा खडसेंना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर, जळगाव भाजपातील अंतर्गत खदखद समोर आलीय. एका बैठकीत खासदार रक्षा खडसे आणि एका भाजपा कार्यकर्त्यात झालेल्या वादाचा व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय. भाजपाच्या खासदार असतानाही गिरीश महाजनांचं नाव न घएता, रक्षा खडसे या एकनाथ खडसेंचं नाव का घेतात असा आक्षेप नोंदवण्यात आलाय. जळगाव जिल्ह्यातील भाजपाच्या बैठकीतला हा व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय ठरलेला आहे. रावेरच्या खासदार रक्षा खडसे यांना उमेदवारी मिळाल्यानंतर, भाजपा पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत त्यांना विचारलेला जाब या व्हिडीओत दिसतोय. खासदार रक्षा खडसेही यात भडकलेल्या दिसतायेत.
बैठकीत नेमकं काय घडलं?
भाजपा नेते, पदाधिकाऱ्यांना डावलण्यात येत असल्याचा आक्षेप भाजपा पदाधिकाऱ्यांनी घेतला. एकनाथ खडसेंचं नाव घेता, गिरीश महाजनांचं का नाही?, असा सवाल भाजपा खासदार रक्षा खडसेंना भाजपा पदाधिकाऱ्याचे विचारला. शरद पवार राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन का फिरता? अशी विचारणाही करण्यात आली. भाजपा उमेदवार निवडून येईल, त्यासाठी भाजपा कार्यकर्ते प्रचारही करतील मात्र उमेदवाराने भाजपा कार्यकर्त्यांना मदत करणं गरजेचं असल्याचं मत भाजपा पदाधिकारी मांडताना दिसले. यावेळी गिरीश महाजनांनी त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. या बैठकीला जिल्ह्यातील आमदार, जळगावच्या उमेदवार स्मिता वाघ यांचीही उपस्थिती दिसतेय.
खडसेंविरोधात नाराजी उघड?
रावेरमध्ये रक्षा खडसेंना भाजपानं उमेदवारी दिल्यानंतर भाजपातील नाराजी या निमित्तानं समोर आल्याचं मानण्यात येतंय. दुसरीकडे महायुतीतले नेतेही खडसेंच्या उमेदवारीवर नाराज असल्याचं दिसतंय. महायुतीला पाठिंबा दिलेले मुक्ताईनगरचे अपक्ष आमदार चंद्रकात पाटील यांनी देखील रावेरमधील उमेदवार बदलण्याची मागणी केलीय. दुसरीकडे चंद्रकांत पाटील हे आमच्या सोबत आहेत. असं रक्षा खडसे सांगतायेत.
एकनाथ खडसे यांनी शरद पवारांची साथ केल्यानंतरही, रक्षा खडसेंना उमेदवारी दिल्यानं नाराजीची भावना व्यक्त होताना दिसतेय. एकनाथ खडसे यांच्या विरोधात असलेले नेते आणि भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते यानिमित्तानं एकवटताना दिसतायेत. त्यात रावेरमधून खडसेंना उमेदवारीच नको, अशी मागणी करण्यात येतेय आता भाजपा प्रदेश पातळीवर या वादाची दखल घेऊन, योग्य उपाय करणार का, हा प्रश्न आहे.