नंदुरबार : एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जाणाऱ्या नंदुरबारमध्ये भाजपच्या हिना गावित यांना टक्कर देण्यासाठी काँग्रेसकडून माजी मंत्री के. सी. पाडवी यांचे सुपूत्र अॅड. गोवाल पाडवी यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
त्यामुळे आता नंदुरबारात वकील विरूद्ध डॉक्टर असा सामना रंगणार आहे. २०१९ च्या लोकसभेत भाजपच्या हिना गावित यांनी गोवाल पाडवी यांचे वडील केसी पाडवांचा पराभव केला होता. आता त्यांचे पूत्र मैदानात उतरले आहे. गोवाल पाडवींकडून गाविकांना टक्कर देता येईल का हे तर निवडणुकीचा निकाल आल्यावर स्पष्ट होईल. दरम्यान कोण आहेत गोवाल पाडवी असा सवाल उपस्थित केला जात आहे. त्याचाच घेतलेला आढावा.
- केसी पाडवी यांचे पूत्र गोवाल पाडवी यांचा जन्म ऑगस्ट १९९२ मध्ये जन्म झाला. त्यांनी वकिलीचं शिक्षण पूर्ण केलं आहे. २०१५ मध्ये मुंबई विद्यापीठातून एलएलबीचं शिक्षण पूर्ण केलं. ते सध्या मुंबई उच्च न्यायालयात वकिली करतात. सायबर लॉमध्ये त्यांनी विशेष काम केलं आहे. शिवाय इलेक्चरल प्रॉपर्टी राइट्सवर विशेष अभ्यास आहे.
- वकिलीच्या माध्यमातून आदिवासींच्या हक्कासाठी बरंच काम केलं आहे. गोंड गोवारी प्रकरणात गोवाल यांनी सरकारचे ज्येष्ठ अधिवक्ता शाम दिवास यांना साथ दिली होती. या लढ्यामुळे सर्वोच्च न्यायालयात यश मिळालं. २५ लाख बनावती जमातींवर वचक बसविण्यात आला आणि आदिवासींना मिळणारे फायदे चोरण्यावर बंदी आणण्यात आली.
- खावटी प्रकरणातही गोवाल पाडवी यांनी काम केलं होतं. महाविकास आघाडीचं सरकार असताना त्यांनी आदिवासींसाठी खावटी जाहीर केली होती. परंतू विरोधकांनी यावर स्थगितीची मागणी केल्याचं सांगितलं जातं. हे प्रकरण न्यायालयात गेल्यानंतर गोवाल यांनी ज्येष्ठ वकील आस्पी चिनॉय यांच्या मदतीने सरकारच्या वतीने युक्तीवाद केला आणि खावटी योजना मंजूर करण्यात आली. या योजनेमुळे १२ लाख कुटुंबांना फायदा झाला. कोरोना काळात प्रथमच १२ लाख आदिवासींची सरकार दरबारी नोंद झाली. कोरोनाच्या काळात ही योजना आदिवासींसाठी मदत करणारी ठरली.
- वकिली करीत असल्याने गोवाल पाडवी यांनी अनेकदा आदिवासींच्या हक्कासाठी न्यायालयात लढाई केली आणि ती जिंकून दाखवली. मग आदिवासी भागातील रस्त्यांच्या कामं असो वा आदिवासी भागात आरोग्य शिबीरांचं आयोजन करणं असो… गोवाल पाडवी हे नंदुरबार, औरंगाबाद आणि नाशिक येथील सर्वसामान्य आदिवासींच्या हक्कांची लढाई प्रशासकीय पातळीवर लढत आहेत.