X : @vivekbhavsar
मुंबई: धुळे – मालेगाव लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार डॉ सुभाष भामरे यांची उमेदवारी जाहीर होताच त्यांच्या विरोधात जाहीर प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. मराठा बहुल मतदारसंख्या असलेल्या या मतदारसंघातील मालेगाव परिसरातून डॉ भामरे यांच्या विरोधात बॅनर लावण्यात आल्याने डॉ भामरे निवडणूक लढण्याआधीच मनाने पराभूत झाले आहेत. त्यामुळे भाजपपुढे संकट उभे राहिले आहे. यातून मार्ग काढण्यासाठी दोन पर्याय पुढे आले आहेत. भाजमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नाशिक आणि धुळे मतदारसंघाची अडलाबदल करून धुळ्याची जागा शिंदे सेनेला सोडायची तर नाशिकमध्ये भाजपने उमेदवार द्यावा असा पर्याय पुढे आला आहे. याच दरम्यान राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते छगन भुजबळ (NCP leader Chhagan Bhujbal) यांचे नाव नाशिकमधून अचानक पुढे आल्याने भाजप नेत्यांची द्विधा मनस्थिती झाली आहे. अशा वेळी उद्धव सेनेचे माजी आमदार प्रा शरद पाटील यांनाच भाजमध्ये प्रवेश देऊन उमेदवारी द्यावी आणि मतदारसंघ आपल्याकडे कायम ठेवावा, असा एक मतप्रवाह भाजपच्या एका गटाकडून पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या गळी उतरविण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.
सलग दोन टर्म खासदार म्हणून निवडून आलेले डॉ सुभाष भामरे यांची “मिस्टर पर्सेंट” अशी प्रतिमा तयार करण्यात त्यांचे विरोधक यशस्वी झाले आहेत. हीच टॅगलाइन घेऊन डॉ भामरे यांचे विरोधक समाज माध्यमावर टीकेची झोड उठवत आहेत. समाज फेसबुक या समाज माध्यमावर डॉ भामरे यांच्या विषयी मतदानाचे सर्वे केले जात असून ते अत्यंत नकारात्मक निकाल दाखवत आहेत. हे सारे अराजकीय समुदायाकडून केले जात असल्याने त्याच्या निकालाची विश्वासार्हता जपली जात आहे. याच नकारात्मक सर्वेमुळे डॉ भामरे निराश झाले असून निवडणूक प्रत्यक्ष लढविण्याआधीच पराभूत झाल्याची चर्चा धुळेकरांमध्ये आहे. ही बाब राज्याच्या नेतृत्वाच्या निदर्शनास आणून देण्यात आल्याचा दावा सूत्रांनी केला आहे.
भाजपसाठी एकेक जागा महत्वाची आहे. त्यामुळे धुळ्यात पराभव होण्यापेक्षा ही जागा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला (Shiv Sena – Eknath Shinde) द्यायची आणि त्या बदल्यात नाशिकची (Nashik) जागा भाजपकडे घ्यायची असा विचार पक्ष पातळीवर सुरू झाला आहे. तसे झाल्यास धुळ्यात सेनेचे मंत्री दादा भुसे (Shiv Sena minister Dada Bhuse) यांचे चिरंजीव यांना लोकसभेच्या मैदानात उतरवले जाईल, असा दावा केला जात आहे. मात्र, दादा भुसे यांचे वर्चस्व केवळ मालेगावात (Malegaon) असून धुळ्यात त्यांना विजयासाठी आवश्यक असलेले मतदान होणार नाही, असा दावा केला जात आहे. भाजप किंवा अगदी पक्ष बदल करून माजी आय पी एस अधिकारी प्रताप दिघावकर यांना शिवसेनेकडून तिकीट दिले गेले तरी मतदारसंघांत त्यांचे कार्य शून्य असल्याने दिघावकरदेखील पराभूत होतील, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
कॉँग्रेसकडे सक्षम उमेदवार नसणे ही बाब भाजपच्या आणि जागा बदल केल्यास शिवसेनेच्या पथ्यावर पडणारी असली तरी भाजप आता रिस्क घेण्याच्या मनस्थितीत नाही. नाशिकची जागा भुजबळ यांच्यासाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी कॉँग्रेसला दिली गेली तर भाजपच्या हातात धुपाटणे येईल, धुळेही गेले आणि नाशिक ही गेले, अशी स्थिति भाजपची होऊ शकेल. म्हणूनच भाजप वेगळ्याच पर्यायचा विचार करत आहे.
यानुसार उद्धव सेनेचे माजी आमदार प्रा शरद पाटील यांना भाजपमध्ये घेऊन त्यांनाच तिकीट दिल्यास भाजपला यश मिळेल का याची चाचपणी सुरू झाली आहे. धुळ्याची (Dhule) जागा कॉँग्रेसची (Congress) असल्याचा दावा करून कॉँग्रेसच उमेदवार देणार, असा निर्णय महाविकास आघाडीच्या (Maha Vikas Aghadi) बैठकीत झाला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी हा मतदारसंघ उबाठा सेनेला (Shiv Sena UBT) अनुकूल असतानाही प्रा पाटील यांना लोकसभा निवडणूक लढण्याचा आग्रह सोडून दे असे स्पष्टपणे सांगितले आहे. मात्र, कॉँग्रेस ज्या शामकांत सनेर यांचे नाव उमेदवार म्हणून पुढे करत आहे, ते सनेर गेल्या वीस वर्षात सगळ्याच निवडणूक हरले आहेत. महापालिका निवडणूक जिंकू शकत नाही, असा उमेदवार लोकसभा निवडणुकीत देणे म्हणजे भाजपला अप्रत्यक्ष मदत करणे आहे, अशी चर्चा धुळ्यात आहे. शिवाय सनेर यांच्यावर ते भाजप नेते अमरीशभाई पटेल यांचा “माणूस” असल्याचा शिक्का आहे.
कॉँग्रेसचे दुसरे संभाव्य उमेदवार तुषार शेळके हे पेशाने डॉक्टर असून मालेगाव चे रहिवासी आहेत. मराठा असले तरी धुळे जिल्ह्यात त्यांचे नातेगोते तुलनेत कमी आहे. प्रा शरद पाटील यांना धुळ्यासह मालेगावात मानणारा मोठा वर्ग आहे. केवळ मराठाच नाही तर मुस्लिम समाजातही त्यांचे समर्थक आहेत. भाजपचे तिकीट मिळाले तरी प्रा पाटील यांना मराठा, मुस्लिम, दलित समाज मतदान करेल आणि भाजपची जागा जिंकून येईल, असे चित्र भाजपच्या एका गटाकडून पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या कानी घालण्यात आले आहे. याबाबतचा अंतिम निर्णय येत्या दोन दिवसात घेतला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.