अमरावती : पंतप्रधान मोदींच्या फोटोसह प्रचाराचा रथ तयार असूनही गेले अनेक दिवस तो धुळखात पडला होता. अखेर विद्यमान खासदार नवनीत राणा यांना भाजपकडून अमरावतीतून उमेदवारी जाहीर केल्यानंतर राणा दाम्पत्य भांड्यात पडले आहेत. महायुतीतील मित्रपक्ष असलेले बच्चू कडूंकड़ून नवनीत राणांना जोरदार विरोध केला जात होता, त्यामुळे अमरावतीतून नेमकं कोण लढणार, याबाबत संभ्रम होता. मात्र आज भाजपची तिसरी यादी समोर आली असून याच नवनीत राणा यांना अमरावती लोकसभेसाठी उमेदवार म्हणून घोषित करण्यात आलं आहे. यानंतर त्या आजच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
नवनीत राणा गत निवडणुकीत राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर अमरावतीतून लोकसभेवर निवडून गेल्या होत्या. परंतु एक-दीड वर्षातच त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व स्वीकारून काँग्रेस-राष्ट्रवादीच्या विरोधात भूमिका घेतली. गेल्या चार वर्षात त्यांनी भाजपची बाजू लावुन धरली आणि हनुमान चालिसा यासांरख्या गोष्टींवरुन उद्धव ठाकरेंना घेरण्याचा प्रयत्न केला. दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतर्फे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांचे नाव रेटले जात होते. अमरावतीची जागा शिवसेनेची असल्याने अडसूळ या जागेवर दावा करीत होते.
मित्रपक्षांकडून पाडण्याचा होणार प्रयत्न?
आम्ही नवनीत राणा यांना शंभर टक्के पाडणार”, असं बच्चू कडू यांनी म्हटलं. “आम्ही आता विरोधात प्रचार करुन त्यांना महायुतीत ठेवायचं किंवा न ठेवायचं हा त्याचा प्रश्न आहे”, असंही बच्चू कडू यांनी स्पष्ट केलं. त्याशिवाय शिंदे गटाचे माजी खासदार आनंदराव अडसूळही बंडखोरी करतात का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.