महाराष्ट्र ताज्या बातम्या

काँग्रेसला वाहिलेली श्रद्धांजली म्हणजे उबाठा गटाची यादी

 संजय निरुपम भडकले तर विश्वजित कदम थेट दिल्लीत गेले

X: @ajaaysaroj

उद्धव बाळासाहेब ठाकरे (उबाठा) गटाची बहुप्रतिक्षित यादी आज जाहीर झाली. काँग्रेसच्या प्रतिष्ठेच्या जागांवर उबाठा गटाने थेट उमेदवारच जाहीर केल्याने काँग्रेस नेत्यांच्या रागाचा बांध फुटला. ही यादी म्हणजे उबाठा गटाने काँग्रेसला दफन करून वाहिलेली श्रद्धांजली आहे, अशी तिखट टीका ज्येष्ठ नेते माजी खासदार संजय निरुपम *Sanjay Nirupam) यांनी केली. तर सांगलीच्या जागेवरून चिडलेले विश्वजित कदम (Vishwajeet Kadam) यांनी या यादी विरोधात थेट दिल्ली गाठली आहे.

जागावाटपाची बोलणी सुरू झाल्यापासून उबाठा गटाने काँग्रेसला ठिकठिकाणी जाहीरपणे खिजवले आहे. संपूर्ण पक्ष फुटला, १३ खासदार आणि ४० आमदार पक्षातून बाहेर पडले, असंख्य पदाधिकाऱ्यांनी संघटनेला जय महाराष्ट्र केला तरी देखील आम्ही खचलेलो नाही, हे महाविकास आघाडीतील (Maha Vikas Aghadi) घटक पक्षांना दाखवण्याची एकही संधी उबाठा गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि आक्रमक नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सोडलेली नाही. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचितला झुलवत ठेवायचे आणि काँग्रेसला आम्ही खिजगणतीतही धरत नाही असा दबाव टाकण्याची खेळी उबाठा गटाने खेळली आहे. जागावाटपाची बोलणी सुरू झाल्यानंतर काही दिवसांतच उद्धव ठाकरे यांनी सांगलीमधून (Sangli) डबल केसरी चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर करून महाविकास आघाडीतील (MVA) मित्र पक्षांना रंग दाखवायला सुरुवात केली होती. 

संजय राऊत यांनी तर शेंडी तुटो वा पारंबी, ही जागा एखादा कट्टर शिवसैनिक नाही तर, जणूकाही तिकीट मिळवण्याच्या बोलीवरच शिवबंधन हाती घेतलेले चंद्रहार पाटीलच (Chandrahar Patil)  लढवणार अशीच भूमिका घेतली आहे. पाटील यांची जाहीर सभेत उमेदवारी घोषित केल्यानंतर काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांनी मविआच्या नेत्यांकडे आणि दिल्लीत श्रेष्ठींच्याकडे तीव्र नाराजी व्यक्त केली. उबाठा गट मनमानी करत असून आघाडीच्या धर्माला हरताळ फासत आहे, अशी तक्रार देखील करण्यात आली. ही जागा परंपरागत काँग्रेसची आहे, इथून आम्हीच लढणार असा पवित्रा नेते विश्वजित कदम यांनी घेतला होता. पण काँग्रेसच्या या धमकीला उबाठा गटाने भीक घातली नाही आणि आज अधिकृत घोषणा करून कदम आणि काँग्रेसच्या अन्य नेत्यांच्या मागणीला केराची टोपली दाखवली आहे. त्यामुळे सांगलीची कैफियत घेऊन कदम यांनी थेट दिल्ली गाठली आहे,  तिथे त्यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते के सी वेणूगोपाल आणि मुकील वासनिक यांची भेट घेऊन उबाठा गटाच्या तक्रारींचा पाढाच वाचला असल्याचे समजते.

इकडे मुंबईतदेखील उत्तर पश्चिम (वायव्य) मतदारसंघात उबाठा गटाने लोकसभा निवडणुका (Lok Sabha elections 2024) जाहीर होण्यापूर्वीच उमेदवार निश्चित केला होता. खिचडी घोटाळ्यात आरोपी असलेले व आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय समजले जाणारे अमोल कीर्तिकर यांची उमेदवारी पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी जाहीर केली होती. आजच्या यादीत कीर्तिकर यांचे नाव अधिकृतपणे आल्यानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी खासदार संजय निरुपम यांचा भडका उडाला आहे. कुठल्याही परिस्थितीत खिचडी चोर व्यक्तीचा मी प्रचार करणार नाही, आज जाहीर झालेली यादी म्हणजे उबाठा गटाने मुंबईमध्ये काँग्रेसला दफन केले असून, ही यादी म्हणजे उबाठा गटाने काँग्रेसला वाहिलेली श्रद्धांजली असल्याची जहरी टीका निरुपम यांनी केली आहे. 

देशभर न्यायाची गोष्ट करणारी काँग्रेस त्यांच्या कार्यकर्त्यांवरच अन्याय करत असून, उभी फूट पडलेल्या उबाठासारख्या एका कमकुवत पक्षाच्या समोर काँग्रेसने गुडघे टेकले आहेत, अशी खंत देखील निरुपम यांनी व्यक्त केली. काँग्रेसच्या जागा उबाठा गटाने अक्षरशः ओरबाडून घेतल्या असून राज्यातील नेतृत्व काँग्रेसच्या जागा वाचवण्यात अपयशी ठरले आहे, असाही आरोप संजय निरुपम यांनी काँग्रेस नेतृत्वावर केला. दक्षिण मध्य मुंबईतदेखील उबाठाने आजच्या यादीतून अनिल देसाई (Anil Desai) यांची उमेदवारी जाहीर करून काँग्रेसच्या जखमेवर मीठ चोळले आहे. माजी मंत्री आणि मुंबईच्या काँग्रेस अध्यक्ष वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी देखील या यादीबाबत नाराजी व्यक्त केली आहे. काँग्रेस नेतृत्वाला विश्वासात न घेताच ही यादी उबाठा गटाने जाहीर केल्याची तक्रार त्यांनी दिल्ली नेतृत्वाकडे केली आहे.

वंचितला (Vanchit Bahujan Aghadi) महाविकास आघाडीतून बाहेर पडायला लावण्याची खेळी, त्यामुळे निर्माण झालेली नाराजी आणि काँग्रेसला जागावाटपात दिलेली अपमानास्पद वागणूक यामुळे उबाठा गटाच्या उमेदवारांना या सर्व वादग्रस्त मतदारसंघात आपली ताकद दाखवून निवडणुकांना सामोरे जावे लागणार आहे.

अजय निक्ते

अजय निक्ते

About Author

अजय निक्ते (Ajay Nikte) हे गेली २८ वर्षे मेनस्ट्रीम पत्रकारितेत कार्यरत आहेत. सामाजिक,सांस्कृतिक, कलाक्षेत्र ते गुन्हेगारी अशा विविध ठिकाणी त्यांची लेखणी लिहिती असली तरी , राजकीय पत्रकारिता हा त्यांचा आवडता विषय आहे. बातमी मागची बातमी आणि संबंधित विषयातील करंट अंडरकरंट्स अचूक हेरून ते लिखाणात उतरवणे ही त्यांची खासियत आहे. अजय उवाच या नावाने ते विविध विषयांवर ब्लॉगही लिहितात.यासह अभिनय ही त्यांची पॅशन असून ,अनेक मराठी ,हिंदी चित्रपट, सिरियल्स ,जाहिराती, शॉर्टफिल्म्स मध्ये त्यांनी अभिनयाचा ठसा उमटवला आहे. "मीडिया ,जर्नालिसम आणि ग्लॅमरवर्ल्ड" या विषयात, पालक आणि विद्यार्थी यांच्यासाठी ते अनेक संस्थांमध्ये व्याख्यानं देतात.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात