मुंबई – लोकसभा निवडणुकांत मराठा समाजाचे उमेदगवार उभे करायचे की नाही, यावर उद्या आंतरवाली सराटीत होणाऱ्या बैठकीत निर्णय घेतला जाणार आहे. मनोज जरांगे पाटील मराठा समाजाच्या बैठकीत याबाबत निर्णय घेणार आहेत. दरम्यान एका वृत्त्वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सामान्यांनी आता सत्तेत जाण्याची गरज असल्याचं वक्तव्य केलंय. मात्र उमेदवार उभे करण्याच्या भूमिकेवर सकल मराठा समाजात एकमत होताना दिसत नाहीये. त्यापूर्वी संभाजीनगरमध्ये उमेदवार ठरवण्यासाठी झालेल्या बैठकीत राडा झालाय.
संभाजीनगरमध्ये काय झालं
मनोज जरांगे पाटील यांनी लोकसभा निवडणुकीचा उमेदवार ठरवावा, यासाठी प्रत्येक जिल्ह्यात बैठक बोलावण्यास सांगितलं होतं. अशीच बैठक छत्रपती संभाजीनगरमध्ये पार पडली. आणि त्याच बैठकीत हा राडा झाला. काही लोक उमेदवारांकडून पैसे घऊन बैठकीत आल्याचा आरोप करण्यात आला. तर काहीजणांनी पैसे घेऊन बैठक बोलावण्यात आल्याचे आरोप केले गेलेत. या राड्याचे राजकीय पडसादही उमटलेत. शिंदेंच्या शिवसेनेकडून इच्छुक असलेल्या विनोद पाटील यांनी यावरून थेट चंद्रकातं खैरे यांच्यावर निशाणा साधलाय. शनिवारी अंतरवाली सराटीत होणाऱ्या बैठकीत चांगला उमेदवार देण्याबाबत चर्चा होईल असंही विनोद पाटील यांनी स्पष्ट केलंय.
सकल मराठा समाजाचा विरोध
मराठ्यांना सरसकट अध्यादेशासह कुणबी प्रमाणपत्र मिळावीत यासाठी जरांगे पाटील यांनी केलेल्या आंदोलनानं ते प्रकाशझोतात आलेत. स्वतः निवडणूक लढणार नसले, तरी निवडणुकांत उमेदवार उतरवण्याची तयारी जरांगे पाटील यांनी सुरु केल्याचं दिसतंय. अशात शनिवारी होणाऱ्या बैठकीपूर्वी आता जालन्यातील सकल मराठा समाजानं उमेदवार उभे करण्यास विरोध दर्शवला आहे. जरांगे पाटील यांनी निवडणूक लढवली तर त्यांना पाठिंबा देऊ, मात्र मराठा उमेदवार उभे केल्यास मराठेच एकमेकांविरोधात भांडू लागतील असा धोका समाजातील लोकांना वाटतोय. उमेदवार उभे करण्याच्या मानसिकतेत असलेले जरांगे पाटील आता काय भूमिका घेणार हा प्रश्न आहे. मराठा समाजाच्या वतीनं उमेदवार उभे केल्यास त्याचा फायदा कुणाला होईल, यावर मराठा समाजातच एकमत होताना दिसत नाहीये. त्यामुळं शनिवारी आंतरवाली सराटीत होणारी बैठकही वादळी होण्याची शक्यता आहे.