अहमदनगर : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके यांनी आज कार्यकर्ता बैठकीत आपल्या पारनेरच्या आमदाकीच्या राजीनाम्याची घोषणा केली. यावेळी लंके यांच्या डोळ्यांमध्ये अश्रू होते आणि कार्यकर्त्यांसमोर ते भावुक झाले होते.
निलेश लंके लोकसभेसाठी इच्छूक आहेत. त्यामुळे शरद पवार यांच्या नेतृत्वात आपल्या लोकसभा निवडणूक लढवायची असल्याचं लंके यावेळी म्हणाले. यावेळी लंकेनी अधिकृतपणे शरद पवार गटात प्रवेश केला. त्यांनी शरद पवार यांच्या तुतारी चिन्हाचा फोटो आपल्या हातात घेतला. त्यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. आता अहमदनगर लोकसभा निवडणुकीत भाजपचे सुजय विखे आणि आ. निलेश लंके यांच्यात लढत होणार हे जवळपास निश्चित झाले आहे.
निलेश लंकेंचं भावनिक आवाहन…
भाषणादरम्यान निलेश लंके म्हणाले, मतदार संघातील सर्वांची माफी मागतो, अजित पवारांची माफी मागतो. कारण तुम्ही मला पाच वर्षांसाठी लोकप्रतिनिधी म्हणून निवडून दिलं. पण आपल्याला लोकसभेला सामोरे जायचे असेल तर कठोर निर्णय घ्यावा लागणार आहे. चार महिने शिल्लक असताना काही कटू निर्णय आपल्याला घ्यावे लागणार आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.
अजित दादांचे मानले आभार..
यावेळी लंकेंनी अजित पवारांचे आभार मानले. आजही अजित पवारांबद्दल आपलं मत चांगलं आहे. दादांनी मला राजकारणात खूप मदत केली.