महाराष्ट्र ताज्या बातम्या

महायुतीत रत्नागिरी, ठाणे आणि कल्याणवरून धुसफूस सुरूच

X: @ajaaysaroj

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मतदारसंघ असलेला ठाणे लोकसभा ,त्यांचे पुत्र डॉ श्रीकांत शिंदे यांचा कल्याण लोकसभा मतदारसंघ आणि शिवसेनेचा आवाज बुलंद करणाऱ्या कोकणातल्या दोन जिल्ह्यांना कवेत घेतलेला रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ या तीन जागांवरून महायुती मध्ये अजूनही धुसफूस सुरूच आहे.

जुना ठाणे जिल्हा किंवा आत्ताचा ठाणे जिल्हा व नवीन पालघर जिल्हा यामध्ये लोकसभेचे चार मतदारसंघ येतात. तर रायगड , रत्नागिरी व सिंधुदुर्ग असे तळकोकणात मिळून दोन लोकसभा मतदारसंघ येतात. थोडक्यात ठाणे व पालघर मध्ये पालघर, ठाणे , कल्याण व भिवंडी असे चार मतदारसंघ येतात तर रायगड , रत्नागिरी व सिंधुदुर्ग यामध्ये रायगड आणि रत्नागिरी असे दोन मतदारसंघ येतात. या सहा मतदारसंघात सध्या रत्नागिरी मध्ये उबाठा गटाचे विनायक राऊत , रायगडमध्ये राष्ट्रवादीचे सुनील तटकरे हे विद्यमान खासदार आहेत. या दोघांच्याही गळ्यात उमेदवारीची माळ त्यांच्या त्यांच्या पक्षाने नुकतीच पुन्हा एकदा घातलेली आहे. रायगडमध्ये विरोधात असणाऱ्या मविआमधील उबाठा गटाने अनंत गीते यांनाच परत उमेदवारी देत आपल्याकडे निवडणूक लढण्याच्या क्षमतेचा एकही नवीन तगडा उमेदवार तीस वर्षानंतर देखील नाहीच अशी एक प्रकारे कबुलीच दिली आहे. त्यामुळे रायगडच्या लढतीचे चित्र हे तटकरे विरुद्ध गीते असे स्पष्ट झाले आहे.

मात्र कळीचा मुद्दा ठरलेल्या रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघात महायुती मध्ये अजून खेचाखेची सुरुच आहे. या प्रतिष्ठेच्या जागेवर भाजप आणि शिवसेना या दोन्ही मित्रपक्षांनी आपला दावा ठोकला आहे. शिवसेनेचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी आपले बंधू किरणभैय्या सामंत यांच्या उमेदवारीसाठी कंबर कसली आहे. शिवसेना जेंव्हा एकसंघ होती तेव्हा या मतदारसंघातून विनायक राऊत यांना घसघशीत मताधिक्य मिळवून देण्याचे मोलाचे काम हे भैय्याशेठ सामंतच करायचे हे सर्वश्रुत आहे. विनायक राऊत वजा सामंत बंधू म्हणजे मोठे शून्य असे रत्नगिरी जिल्ह्यात आजही बोलले जाते. ही जागा शिवसेनेने हक्काने मागण्याचे कारणही तसेच आहे. संपूर्ण कोकणपट्टी ही मुंबईत असणाऱ्या चाकरमान्यांमूळे शिवसेनेसाठी नेहमीच एक हक्काची आणि हळवी बाजू राहिली आहे. नारायण राणे यांच्या सारखा फायरब्रॅंड नेता या कोकणातील मातीनेच शिवसेनेला आणि महाराष्ट्राला दिला आहे. शिवसेनेची निशाणी धनुष्यबाण ही इथल्या घराघरात आणि मनामनात गेली अनेक दशके ठाण मांडून आहे.

त्यामुळे ही जागा आम्हांलाच द्यावी यासाठी शिवसेना आग्रही आहे. भाजपने देखील या जागेसाठी एकदम टाईट फिल्डिंग लावली आहे. कोकणातील भाजपचे जुने जाणते नेते प्रमोद जठार आणि माजी खासदार डॉ निलेश राणे यांनी संयुक्तपणे या संपूर्ण मतदारसंघात २०१९ च्या निवडणुकिनंतर गेली पाच वर्षे कामाचा झपाटा लावला आहे. या दोघांनी हा पूर्ण मतदारसंघ पिंजून काढला आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे, आमदार नितेश राणे आणि कॅबिनेट मंत्री व पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून , निधीतून इकडे अनेक विकासकामे केली आहेत त्याचा फायदा भाजपला होणार आहे. २०१९ च्या निवडणुकीत अपक्ष उभे राहून देखील नरेंद्र मोदी लाट असताना डॉ निलेश राणे यांनी विनायक राऊत यांच्या विरोधात तब्बल २,७९,७०० अशी ३१ टक्के मिळवली होती.

मुळात डॉ राणे आणि जठार हे दोघेही इथून इच्छुक असले तरी दोघांमध्ये एकवाक्यता असल्याने त्यांच्यात तिकीट मिळवण्यासाठी कुठलाह वाद नाही. ज्याला तिकीट मिळेल त्याला निवडून आणण्यासाठी हे दोघेही जीवाचे रान करतील हे भाजपच्या नेत्यांना चांगले माहिती आहे. अर्थात त्याला स्थानिक राजकारणाची देखील एक महत्त्वाची किनार आहे. जर ही जागा भाजपला मिळाली आणि इथे डॉ निलेश राणे किंवा प्रमोद जठार यांच्यापैकी एकाला उमेदवारी मिळाली तर दुसऱ्यासाठी येणाऱ्या विधानसभेत कुडाळ मालवणची जागा आपसूकच खुली होणार आहे. पण ही जागा शिवसेनेला गेली तर भाजपची अडचण केवळ एक जागा शिवसेनेला देणे एवढीच नाहीये. ज्येष्ठ नेते नारायण राणे यांना राज्यसभा तिकीट न देण्यामागे राणे यांनीच तब्बेतीचे कारण सांगितले होते असे बोलले जाते. पण त्याच बरोबर डॉ निलेश राणे यांचे राजकीय पुनर्वसन हा देखील एक अजेंडा आहेच. भाजपला देखील डॉ राणे यांच्यासारख्या आक्रमक , उबाठा गटाला थेट अंगावर घेणारा आणि त्याचवेळेला सुशिक्षित असा चेहरा हवाच आहे. प्रामुख्याने उबाठा गटा कडून भाजप नेत्यांवर केल्या जाणाऱ्या खालच्या पातळीवरील टीकेला , डॉ निलेश राणे अरे ला का रे करण्याच्या शैलीत जे उत्तर देतात त्याला भाजपच्या नेत्यांनी सोडाच पण तळागाळातील कार्यकर्त्यांनी नेहमीच डोक्यावर घेतले आहे.

भाजपची ही मूळ कार्यशैली नसल्याने त्यांना राणे बंधू हे नेहमीच उबाठाला रोखठोकपणे बोलणारे पक्षातील असेट वाटत आले आहेत. यासाठी डॉ राणे यांचे राजकीय पुनर्वसन हे केवळ राणे कुटुंबियांसाठीच नाहीतर भाजप साठी देखील विधानसभा निवडणुका लक्षात घेता आगामी काळात महत्त्वाचे ठरणार आहे. पण ही जागा शिवसेनेकडे गेली तर मात्र प्रमोद जठार आणि डॉ निलेश राणे या दोघांच्या भावी राजकीय वाटचालीचा प्रश्न निर्माण होणार आहे. त्यामुळे रत्नागिरी लोकसभेची जागा ही भाजपच्या दृष्टीने देखील अनेक कारणांमुळे महत्त्वाची झाली आहे. कोकणात रायगडची एक जागा राष्ट्रवादीला दिल्यामुळे व दुसरी शिवसेनेला दिल्यामुळे कोकण पट्ट्यातील भाजपचे अस्तित्वच जणूकाही पुसले जाईल अशी रास्त भीती भाजपच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी पक्षश्रेष्ठींना बोलून दाखवली आहे.

ठाणे लोकसभा मतदारसंघात देखील सहापैकी चार विधानसभा मतदारसंघ हे भाजपचे आहेत. असे असताना केवळ मुख्यमंत्री शिंदे यांचा मतदारसंघ या लोकसभा मतदारसंघात येतो म्हणून शिवसेनेने इथे दावा सांगावा हे भाजपला पटलेले नाही. भाजपचे ज्येष्ठ आमदार संजय केळकर यांनी तर , योग्य उमेदवार दिला तरच ठाणे जिल्ह्यातील सगळे उमेदवार निवडून येतील असे सांगून ठाणे जिल्ह्यातील उमेदवारांची निवड योग्यच करावी असा जणू इशाराच शिवसेनेला दिला आहे. पालघरची जागा विद्यमान खासदार राजेंद्र गावित हे शिवसेनेचे असल्याने शिवसेनाच जर ही जागा लढवणार असेल तर कल्याण किंवा ठाणे भाजपला द्यावी म्हणजे ठाणे जिल्ह्यात , भाजपला दोन व शिवसेनेला दोन असे समसमान वाटप होईल असा प्रस्ताव ठेवला आहे. भिवंडी या जागेवर भाजपने कपिल पाटील यांची उमेदवारी पहिल्या यादीतच जाहीर केली आहे. कल्याण येथे मुख्यमंत्री पुत्र डॉ श्रीकांत शिंदे विद्यमान खासदार आहेत. भाजपचे केंद्रीय नेते अनुराग ठाकूर यांनी गेले वर्षभर इथे मेळावे आणि कार्यक्रम घेऊन भाजप ही जागा लढवणार असे चित्र राजकारणाचा एक भाग म्हणून उभे केले होते.

त्यात काही गैर वाटण्याचे कारणही नव्हते , देशपातळीवर असणारा मोठा पक्ष हा प्रत्येक मतदारसंघात असले मेळावे घेतच असतो. पण माध्यमांनी देखील लगेचच भाजपने या जागेवर दावा ठोकला , अशा वावड्या उठवायला सुरुवात केली. त्यात भर म्हणून या मतदारसंघात भाजप आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यां मध्ये देखील खटके उडू लागले , कुरबुरी सुरूच राहिल्या , पण भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी केलेला शिवसेनेचे महेश गायकवाड यांच्यावरील गोळीबार हा सर्वांनाच धक्का देऊन गेला. या गोळीबारा मागे केवळ जमिनीचा वाद आणि आर्थिक गणित असले तरी काही माध्यमांनी नेहमीप्रमाणे त्याला राजकीय रंग दिला . पण आता या सर्व कुरबुरी ,भाजपची नाराजी ,आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या मुंब्रा कळवा येथून मिळणारे मतदान , कल्याण ग्रामीण या मनसेच्या आमदार राजू पाटील यांच्या मतदारसंघामधून होणारे मतदान याचा फटका यावेळी डॉ शिंदे यांना बसू शकतो असा बागुलबुवा जाणूनबुजून उभा केला जात आहे. त्यामुळे ही जागा भाजपला सोडावी असे नरेटिव्ह भाजपने मांडले असल्याचं समजतंय. अर्थात गेले काही दिवस सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी डॉ शिंदे यांना बरोबर घेऊन इथून अनेक मेळावे पार पाडले आहेत. डॉ शिंदेच इथून उमेदवार असतील अशी ग्वाहीही दिली आहे.

ठाणे हा मुख्यमंत्री शिंदे रहात असलेला आणि त्यांचा विधानसभा मतदारसंघ अंतर्भूत असलेला लोकसभा मतदारसंघ तर कल्याण हा त्यांचे पुत्र डॉ श्रीकांत यांचा लोकसभा मतदारसंघ , त्यामुळे हे दोन्ही मतदारसंघ मुख्यमंत्री शिंदे यांच्या दृष्टीने प्रतिष्ठेचे आहेत. यातला एक जरी मतदारसंघ भाजपला सोडला तर आपल्या स्वतःच्या पक्षात, शिवसेनेत एक वेगळा मेसेज जाईल अशी अडचण मुख्यमंत्र्यां समोर आहे. त्यामुळेच कदाचित हे दोन्ही मतदारसंघ शिवसेनेकडेच ठेवून, नेहमीप्रमाणे मतदारांना गृहीत धरून पालघरचे शिवसेनेचे खासदार गावित यांना भाजप मध्ये बेडूकउडी मारायला लावायची आणि ही जागा भाजपला सोडायची अशी खेळी महायुती कडून खेळली जाऊ शकते.

ठाणे जिल्ह्यातील चार पैकी , शिवसेना तीन जागा स्वतःकडे ठेवते व एकच जागा देऊन भाजपची बोळवण करते, की दोन जागा भाजप स्वतःच्या पदरात पाडून घेऊ शकते हे एकदोन दिवसातच स्पष्टपणे समोर येईल .

अजय निक्ते

अजय निक्ते

About Author

अजय निक्ते (Ajay Nikte) हे गेली २८ वर्षे मेनस्ट्रीम पत्रकारितेत कार्यरत आहेत. सामाजिक,सांस्कृतिक, कलाक्षेत्र ते गुन्हेगारी अशा विविध ठिकाणी त्यांची लेखणी लिहिती असली तरी , राजकीय पत्रकारिता हा त्यांचा आवडता विषय आहे. बातमी मागची बातमी आणि संबंधित विषयातील करंट अंडरकरंट्स अचूक हेरून ते लिखाणात उतरवणे ही त्यांची खासियत आहे. अजय उवाच या नावाने ते विविध विषयांवर ब्लॉगही लिहितात.यासह अभिनय ही त्यांची पॅशन असून ,अनेक मराठी ,हिंदी चित्रपट, सिरियल्स ,जाहिराती, शॉर्टफिल्म्स मध्ये त्यांनी अभिनयाचा ठसा उमटवला आहे. "मीडिया ,जर्नालिसम आणि ग्लॅमरवर्ल्ड" या विषयात, पालक आणि विद्यार्थी यांच्यासाठी ते अनेक संस्थांमध्ये व्याख्यानं देतात.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात