मुंबई : ऐन लोकसभेच्या तोंडावर काँग्रेसने (Congress) महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि भाजपचे सोलापूरचे उमदेवार राम सातपुते (Ram Satpute )यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे . काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे (Atul Londhe Patil )यांनी फडणवीस यांनी त्यांच्या पदाचा गैरवापर करून आचारसंहिता भंग केल्याची तक्रार करत त्यांची गृहमंत्रिपदावरून हकालपट्टी करावी,’ अशी मागणी देखील आयोगाकडे केली आहे.तसेच सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार तथा आमदार राम सातपुते यांनी मोची समाजाचा प्रश्न फोनवरून फडणवीस यांच्याकडे मांडला. त्यावर फडणवीस यांनी गुन्हे मागे घेण्याबाबतचे आश्वासन दिले, त्यामुळे फडणवीस आणि सातपुते अडचणीत येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule )यांच्याविरोधात काँग्रेसने आचारसंहिता भंगाची तक्रार केली असतानाच आता काँग्रेसने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात निवडणूक आयोगाचे दार ठोठावले आहे .त्यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ होणार आहे .दरम्यान याबाबत बोलताना लोंढे म्हणाले , आतापर्यंत या समाजातील व्यक्तींवरील गुन्हे का मागे घेतले नाहीत? आता निवडणुकीच्या दरम्यानच या गुन्ह्यांची आठवण कशी झाली? फडणवीस गुन्हे मागे घेण्याचे आश्वासन देण्यासाठी निवडणुकीची वाट पहात होते का? असे प्रश्न उपस्थित करत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पदाचा गैरवापर केल्याचे स्पष्ट दिसत आहे, फडणवीस यांना गृहमंत्रीपदावरून तात्काळ दूर करावे तसेच सोलापूरचे भाजप उमेदवार राम सातपुते यांची उमेदवारी रद्द करा, अशी तक्रार काँग्रेस पक्षाने निवडणूक आयोगाकडे केली असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान काँग्रेस पक्षाने केलेल्या तक्रारीमुळे देवेंद्र फडणवीसांच्या अडचणीत वाढ झाली असून गृहमंत्री पदही धोक्यात आले आहे. फडणवीसांवर आचारसंहितेचा भंग, मतदारांना प्रलोभन देण्याचा ठपका काँग्रेस कडून ठेवण्यात आला आहे.आता निवडणूक आयोग तक्रारीची कितपत दखल घेते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. निवडणूक आयोगाकडे पंतप्रधान मोदी पासून ते भाजपच्या सामान्य कार्यकर्तांपर्यन्त अनेक तक्रारी दाखल आहेत. परंतु आयोगाने भाजपवर कुठलीही कारवाई केली नसल्याचा आरोप विरोधक करत आहेत .