मुंबई : काँग्रेसच्या( Congress) रामटेक लोकसभा (Ramtek Lok Sabha)मतदारसंघातील अधिकृत उमेदवार रश्मी बर्वे (Rashmi Barve )यांचे जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने रद्द केले. समितीच्या या निर्णयाविरोधात बर्वे यांनी न्यायायात धाव घेतली होती .मात्र त्यांच्या उमेदवारी अर्ज रद्द करण्याच्या निर्णयाला स्थगिती देण्याची विनंती मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने फेटाळली होती.त्यानंतर उच्च न्यायालयाच्या या निर्णयाला आव्हान देत रश्मी बर्वे यांनी सर्वोच्च न्यायालयात विशेष परवानगी याचिका दाखल केली होती .मात्र आता ही याचिका देखील सुप्रीम कोर्टाने(Supreme court)फेटाळून लावली आहे. त्यामुळे बर्वे यांच्या अडचणींमध्ये वाढ होणार आहे
रामटेक मतदारसंघात रश्मी बर्वे या महाविकास आघाडीच्या उमेदवार असून काँग्रेसतर्फे त्यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. मात्र त्यांच्या जात पडताळणीचा मुद्दा उपस्थित झाला . आणि त्यांचं भवितव्य धोक्यात आलं . आता याप्रकरणी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आलेली होती. आज त्यावर सुनावणी झाली. सुप्रीम कोर्टाने उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवत बर्वे यांची याचिका फेटाळून लावली. या सुनावणी दरम्यान कोर्टाने सरकारवरही ताशेरे ओढले.लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर असा निर्णय आल्याने काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला असून, महाविकास आघाडीचीही अडचण झाली आहे .
दरम्यान जात वैधता प्रमाणपत्रासंदर्भात जात प्रमाणपत्र पडताळणी समिती आणि सामाजिक न्याय विभागाकडून माझ्यावर करण्यात येत असलेली कारवाई बेकायदेशीर असल्याचा दावा बर्वे यांनी नागपूर खंडपीठात दाखल केलेल्या याचिकेत केला होता. त्यानंतर नागपूर खंडपीठाने 4 एप्रिल रोजी रश्मी बर्वे यांचे जातवैधता प्रमाणपत्र रद्द करण्याच्या समितीच्या निर्णयाला अंतरिम स्थगिती दिली. परंतु, लोकसभा निवडणूक प्रक्रियेत हस्तक्षेप करण्यास न्यायालयाने नकार देत उमेदवारी रद्द करण्याच्या निर्णयाला स्थगिती देण्याची विनंती फेटाळली. त्यामुळे रश्मी बर्वे यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली होती. सुप्रीम कोर्टाने ही याचिका फेटाळल्याने बर्वे यांना दिलासा मिळालेला नाही. मात्र आता रश्मी बर्वे यांच्या नंतर पर्यायी उमेदवार म्हणून अर्ज दाखल केलेले त्यांचे पती श्यामकुमार बर्वे (Shyamkumar Daulat Barve)हे काँग्रेसचे रामटेकमधून अधिकृत उमेदवार असतील.