मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) पार्श्वभूमीवर आज त्यांच्या पक्षाचे नवं गीत मुंबईतील शिवसेना भवनामध्ये लाँच केलं आहे . मशाल चिन्हाने आमची अंधेरी पोटनिवडणुकीत विजयी सुरुवात झाली होती. मशालीने हुकूमशाही राजवट भस्म होईल हा विश्वास आहे” असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले आहेत .दरम्यान यावेळी खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आणि अन्य नेतेही उपस्थित होते.
शिवसेना ठाकरे गटाने मशाल हे निवडणूक चिन्ह मिळाल्यानंतर सर्वप्रथम पोटनिवटणुकीत शिवसेनेनं मशाल गीत लाँच केलं होतं. आता, लोकसभा निवडणुकांच्या अनुषंगाने पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंच्या हस्ते मशाल गीताचे अनावरण करण्यात आले. धगधगती पेटू दे मशाल.. असं हे टायटल साँग असून कार्यकर्त्यांनी घराघरात हे गीत आणि शिवसेनेचं नवं चिन्ह पोहोचविण्याचं आवाहन उद्धव ठाकरेंनी केलं आहे. तसेच, पोटनिवडणुकीतून विजयाची मशाल पेटली होती,अशी आठवणही उद्धव ठाकरेंनी यावेळी बोलून दाखवली आहे . या निवडणुकीसाठी संगीतकार राहुल कानडे यांनी एक वर्षापूर्वीच हे प्रचारगीत उद्धव ठाकरेंकडे दिल होते. आता, लोकसभा निवडणुकीतील उमेदवारांच्या प्रचारासाठी नव्याने हे गीत ठाकरेंच्या शिवसेनेचा आवाज बनणार आहे.
शंखनाद होऊ दे, रणदुदंभी वाजू दे
नादघोष गर्जू दे विशाल
द़ष्टशक्ती जाळण्या, मार्ग स्पष्ट दावण्या
धगधगती पेटू दे मशाल
असा शंखनाद या मशाल गीतातून ऐकायला मिळणार आहे. त्यामुळे, आगामी लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचं मशाल गीत शिवसैनिकांमध्ये स्फूर्ती व ऊर्जा जागवण्याचं काम करेल. दरम्यान मशालीचं तेज आणि आगामी लोकसभा निवडणुकीत दिसेल. मशालगीत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचेल,” चिन्ह नवीन आहे, पण मशाल महाराष्ट्राला नवीन नाही. ही मशाल अधिक प्रकाशमान आणि तेजस्वी होईल असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे
दरम्यान लोकसभेची लढाई ही लोकशाही विरुद्ध हुकूमशाही अशी आहे. आम्ही महाराष्ट्रात ४८ जागा जिंकू. ४५+ हा भाजपाचा देशातला आकडा आहे. आम्ही महाराष्ट्रात आम्ही ४८ जागा जिंकू असं सांगत उद्धव ठाकरेंनी भाजपाला टोला लगावला आहे. धूळ गोळा करणारा व्हॅक्युम क्लिनर असतो तसा भाजपा हा पक्षही भ्रष्टाचारी गोळा फिरतो आहे. असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. तसेच या निवडणुकीत सांगलीच्या जागेवरुन सुरु असलेल्या वादावर बोलताना उद्धव ठाकरेंनी, गद्दारी होत असेल तर त्या संबंधित पक्षाने लक्ष घातलं पाहिजे असं म्हटलं आहे. तसंच बंडखोरी झाल्यास जनता माफ करणार नाही असा इशाराही दिला आहे.