नवनवीन व्हिडिओ, आकर्षक प्रचार गाण्यांनी वाढवली रंगत
X : @therajkaran
मुंबई : राज्याचे अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी शेतकऱ्यांसाठीच्या बळीराजा मोफत वीज सवलत योजनेची (Baliraja Mofat Vij Sawalat Yojana) माहिती देणारा एक व्हिडिओ त्यांच्या एक्स या सोशल मीडिया माध्यमावर पोस्ट केला आहे. शेतकऱ्यांना रात्री वीज पुरवली जायची, ज्यामुळे रात्री- अपरात्री पीकांना पाणी देण्यासाठी त्यांना शेतात जावं लागे. यावेळी, वन्य प्राण्यांच्या हल्ल्याची भीती असायची. महिला आपल्या पतीची, मुलांची ते शेतात गेल्यानंतर काळजी करत, वाट पाहत ताटकळत राहायच्या. आता शेतकऱ्यांसह त्यांच्या कुटुंबांची या त्रासातून मुक्तता झाली आहे.
ग्लोबल वॉर्मिंगचे (Global Warming) दुष्परिणाम शेती क्षेत्रावर झाल्यानं त्याचा फटका शेतकऱ्यांना भोगावा लागत आहे. सरकारचा अर्थसंकल्प (Budget) सादर करताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विविध प्रश्नांचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना मदतीसाठी बळीराजा वीज सवलत योजना घोषित केली होती. या योजनेद्वारे महायुती सरकारनं (Mahayuti government) शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवण्यासह त्यांच्यावर येणाऱ्या वीजबिलाचा भार उचलण्याचं ठरवलं आहे. राज्यातील 44 लाख 6 हजार शेतकऱ्यांच्या 7.5 अश्वशक्ती क्षमतेपर्यंतच्या शेतीपंपांना पूर्णतः मोफत वीज (free electricity) पुरवली जाणार आहे. यासाठी 14 हजार 761 कोटी रुपये अनुदान (subsidy) स्वरूपात उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
बळीराजा वीज सवलत योजनेची माहिती देणारा व्हिडिओ उपमुख्यमंत्री अजित पवारांनी शेअर करत शेतकऱ्यांप्रती असलेली त्यांची बांधीलकी स्पष्ट केली आहे. हा व्हिडिओ पोस्ट करताना “जगाचा पोशिंदा माझा बळीराजा आहे. तो आपला अन्नदाता आहे. तो काळ्या मातीत घाम गाळतो, शेती करतो तेव्हा आपल्या सर्वांच्या घरी अन्नधान्याची कमतरता भासत नाही. तो जगला तर आपण सगळेच जगलो. त्यामुळे माझ्या शेतकऱ्यांना सुगीचे दिवस यावेत याकरिता आवश्यक ती सर्व पावलं उचलण्यास आम्ही वचनबद्ध आहोत. जसं की पीक विमा योजना आणि वीज बिल माफी!” असं अजित पवारांनी लिहीलं आहे.