इंदापूर (पुणे): निवडणुकीत मला स्वत:ला उभं राहायचं नाही. जनतेने मला 14 वेळा निवडून दिले. त्यातल्या सात वेळा इंदापूर तालुक्यातील जनतेने मला मतं दिली. त्यामुळे आता मला स्वत:साठी काहीच मागायच नाही. मला महाराष्ट्राचा चेहरा बदलायचा आहे. राज्यातील सर्वसामान्य जनतेचे जीवन बदलायचं आहे. हे करायचं असेल, तर ज्यांच्याकडे कर्तृत्व, अनुभव, प्रशासन आहे अशाही लोकांची गरज आहे. त्याची पूर्तता करण्यासाठी अशा लोकांना विधानसभेत पाठवणं हे तुमचं काम आहे आणि राज्याचं काम करण्याची जबाबदारी सोपवणं माझं काम आहे, अशा स्पष्ट शब्दात राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी आज हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) यांच्यावर नजिकच्या भविष्यात सोपवण्यात येणाऱ्या मोठ्या जबादरीचे सुतोवाच केले.
पूर्वाश्रमीचे कॉँग्रेसचे माजी मंत्री आणि गेले पाच वर्षे भाजपसोबत (BJP) असलेले हर्षवर्धन पाटील यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला आहे. यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil), बारामतीच्या खासदार व कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे (MP Supriya Sule), शिरूरचे खासदार अमोल कोल्हे, माढाचे खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्यासह इतर नेते उपस्थित होते.
पवार म्हणाले की, आम्ही वेगवेगळ्या पक्षात असू, पण जेव्हा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या हिताचा प्रश्न आला तेव्हा आम्ही नेहमीच एकत्र काम केले. कृषी सुधारणांसाठी जेव्हा – जेव्हा नवीन नेतृत्वाची गरज भासली, तेव्हा हर्षवर्धन पाटील यांना नेहमीच पहिली पसंती असते. हा केवळ इंदापूरचा निर्णय नाही. परंतु महाराष्ट्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आणि संपूर्ण देशातील कृषी क्षेत्रासाठी हा महत्वपूर्ण निर्णय आहे, असे शरद पवार म्हणाले.
मी या पक्षात प्रवेश करण्यापूर्वी माझी आणि जयंत पाटील यांची जेव्हा जेव्हा भेट व्हायची, आमचं भेटणं किंवा बोलणं व्हायचं. आम्ही फोनवर देखील सतत बोलायचो. मला काही मिळावं म्हणून पक्ष प्रवेश केलेला नाही. तुम्ही जी जबाबदारी द्याल ती घेऊ. मी शब्दाचा पक्का आहे. राजकारण व्यक्तिगत स्वार्थासाठी करत नाही. कार्यकर्त्यांनी आग्रह धरल्यामुळेच आज तुतारी हातात घेतली, असे हर्षवर्धन पाटील म्हणाले.
खासदार सुप्रिया सुळे आमच्या भगिनी आहेत आणि आम्हाला त्यांचा अभिमान आहे. सुप्रियाताई चार वेळा खासदार झाल्या, आधी तीन वेळा जेव्हा त्या खासदार झाल्या, त्यावेळी त्यांच्या विजयात थोडंफार का होईना, आमचंही योगदान होतं. मात्र, नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांच्या विजयात आमचा अदृश्य सहभाग होता, अशी कबुली हर्षवर्धन पाटील यांनी दिली.