- अॅड. आशिष शेलार यांचा हल्लाबोल; धारावीच्या पुनर्विकासाला विरोध म्हणजे, मुंबईच्या सुनियोजित विकासाला विरोध
मुंबई : धारावी पुनर्विकास प्रकल्पाची पुनर्निविदा काढून ३७ एकरचा भूखंड गिळंकृत करण्याचा ‘उबाठा’चा डाव आहे. उद्धव ठाकरेंच्या द्वितीय पुत्राच्या वनस्पती आणि प्राणीप्रेमासाठी हे षड्यंत्र रचले जात आहे. आशियातील सगळ्यात मोठ्या झोपडपट्टीत (धारावी) मरणयातना भोगणाऱ्या गोरगरीबांना चांगली घरे मिळताहेत, हे त्यांना बघवत नाही. त्यामुळेच मुंबईच्या सुनियोजित विकासाला ते विरोध करीत असल्याची घणाघाती टीका भाजपचे मुंबई अध्यक्ष आमदार अॅड. आशिष शेलार यांनी गुरुवार, दि. ७ नोव्हेंबर रोजी केली.
महाविकास आघाडीच्या संयुक्त सभेत उद्धव ठाकरेंनी धारावी पुनर्विकास प्रकल्पावरून केलेल्या आरोपांना आशिष शेलार यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. वांद्रे येथे माध्यमांशी संवाद शेलार म्हणाले, धारावीचा पुनर्विकासाचा उल्लेख आघाडीच्या पंचसूत्रीत नाही. पण, आज उद्धव ठाकरे यांनी वचननामा जाहीर करून धारावीबाबत भूमिका मांडली. म्हणजे ही त्यांची वैयक्तिक भूमिका आहे का? ती आघाडीची भूमिका नाही का? याचे स्पष्टीकरणा ठाकरेंनी द्यावे. कुणीतरी स्क्रीप्ट लिहून दिली आणि ते बोलले.
अदानीला जागा देण्याचे सरकारी निर्णय म्हणजे फेक नेरेटिव्ह आहे का? हे उद्धव ठाकरे यांचे वाक्य म्हणजे फेकमफाक असल्याचा टोला शेलार यांनी लगावला. याविषयी सत्य परिस्थिती मांडताना ते म्हणाले, राज्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत ‘डीआरपी’ अर्थात धारावी रिडेव्हलपमेंट प्रोजेक्टला जागा देण्याचे ठरले. ही संस्था १०० टक्के सरकारच्या मालकीची आहे. मग अदानीला जागा दिल्याचा मुद्दा कुठून आणला? सातबारावर अदानीचे लावले किंवा तसा प्रस्ताव तयार केल्याचा एकतरी पुरावा उद्धव ठाकरेंनी द्यावा. पण, ते देऊ शकणार नाहीत. कारण ते फेकमफाक करीत आहेत.
मुळात धारावीच्या पुनर्विकासाला अतिरिक्त जागा द्यायला लागली तर द्यावी, असे प्रावधान उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री असतानाच केले होते. फेकमफाक करण्यापेक्षा त्यांनी या प्रश्नाचे उत्तर द्यावे. देवनार कचराभूमीच्या ठिकाणी प्रक्रिया करून तयार होणारी जागा धारावी पुनर्विकास प्रकल्पाला देण्यास तुमचा विरोध का? धारावीत आम्ही आंतरराष्ट्रीय वित्तीय पार्क उभारणार असल्याचा दावा उद्धव ठाकरेंनी केला. असे आंतरराष्ट्रीय ठराव आणायला आधी केंद्र सरकारचा ठराव लागतो. अद्याप तुम्ही राज्यातील सत्तेपासून कोसो दूर आहात, मग जे तुमच्या अखत्यारित नाही, त्याबद्दल का बोलता? त्यामुळे धारावी पुनर्विकासाच्या बाबतीत दिलेले आश्वासन म्हणजे लबाडा घरचे जेवण आहे. आमचे मत स्पष्ट आहे, धारावीच्या पुनर्विकासाला विरोध म्हणजे मुंबईच्या सुनियोजित विकासाला विरोध. ४३७ चौरस किमीच्या मुंबईत ५५० एकरच्या धारावी पुनर्विकासाला विरोध करणे, याचा अर्थ त्यांना नियोजनबद्ध विकास नकोय. त्यामुळे मुंबईकरांनी उबाठा सेनेला दंडीत करा, असे आवाहन आशिष शेलार यांनी केले.
……………….
पाकिस्तानचे समर्थन करणाऱ्या काँग्रेसला जोडे मारणार का?
जम्मू काश्मिरच्या विधानसभेत नॅशनल कॉन्फरन्स आणि त्यांना पाठिंबा देणाऱ्या काँग्रेसने त्या राज्याला विशेष दर्जा मिळावा, असा ठराव आणला. तो एकतर्फी मंजूर करण्याचा प्रयत्न केला. खरेतर त्यात कलम ३७० आणि ३५ (अ) यांचा उल्लेख नाही. तरीही ज्या पद्धतीचा ठराव आणण्यात आला, तो पूर्णतः बेकायदेशीर आहे. भाजपने विधानसभेत त्याला कडाडून विरोध केला. मूळात विशेष राज्याची मागणी करणे, याचा अर्थ पाकिस्तान जगातील वेगवेगळ्या व्यासपीठांवर जी मागणी वारंवार करतोय, त्याचे समर्थन करण्यासारखे आहे. काँग्रसचे त्याला समर्थन आहे. उद्धव ठाकरे या काँग्रेसला जोडे मारणार का? याबाबत भूमिका स्पष्ट करा. कोणताही कायदेशीर आधार नसलेला अशाप्रकारचा ठराव मांडून अशांतता पसरवण्याचा प्रयत्न ‘इंडी’ आघाडी करीत आहे. महाराष्ट्रातसुद्धा असे वातावरण तयार करण्याचा मविआचा मनसुबा आहे. त्यामुळेच शहरी नक्षलवाद्यांची भाषा उद्धव ठाकरेंच्या तोंडी यायला लागली आहे. त्यामुळे हळूहळू उरला सुरलेला शिवसैनिक उद्धव ठाकरेंना ‘जय महाराष्ट्र’ऐवजी ‘लाल सलाम’ करण्याच्या तयारीत असल्याचा टोला अॅड. आशिष शेलार यांनी लगावला.
………………………..
कोळी बांधवांची माथी भडकवू नका
शहरातील कोळीवाडे आणि गावठाणांवर महायुती सरकारची वक्रदृष्टी आहे. या परिसरात क्लस्टर डेव्हलपमेन्ट करण्याचा घाट सत्ताधाऱ्यांनी घातला आहे. म्हणजेच सर्वांना एकत्र करून टॉवर बांधायचे आणि बाकीची जमीन आपल्या मित्राच्या घशात घालण्याचा महायुतीचा विचार आहे, असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला होता. त्याला प्रत्युत्तर देताना आशिष शेलार म्हणाले, “कोळीवाड्यांचे सीमांकन करण्याचे काम महायुतीच्या सरकारने केले. त्यामुळे उगाच आमच्या कोळी बांधवांची माथी भडकवू नका. उद्धव ठाकरे यांच्या काळात वरळी कोळीवाड्याला झोपडपट्टी जाहीर करण्यात आली होती. त्यामुळे फेकमफाक करून नका”, असा टोला शेलार यांनी लगावला.