नागपूर – भारतीय संगीतविश्वाला ‘एक सूर, एक ताल’ या अद्वितीय समूहगान संकल्पनेद्वारे समृद्ध करणारे प्रसिद्ध संगीतकार पद्मश्री वसंत देसाई यांच्या ४९व्या स्मृतीदिनानिमित्त स्वरांजली अर्पण करण्यात येणार आहे. युवा कला मंच आणि स्वरांगण गीत समूहाच्या वतीने हा कार्यक्रम रविवार, २२ डिसेंबर रोजी सकाळी ८.३० वाजता मुंबईतील दादर येथे आयोजित करण्यात आला आहे.
सोमनाथ परब यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम
संगीतकार व वसंत देसाई यांचे शिष्य सोमनाथ परब यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम संपन्न होणार आहे. गेली चार दशके ‘एक सूर, एक ताल’ संकल्पना जपत, विद्यार्थ्यांना संस्कारशील बनविणाऱ्या परब यांच्या पुढाकारातून हा उपक्रम दरवर्षी आयोजित केला जातो.
चारशे विद्यार्थी आणि शिक्षकांचा सहभाग
दादर येथील वसंत देसाई चौक, शिवाजी पार्क येथे होणाऱ्या या स्वरांजली उपक्रमात चारशेहून अधिक विद्यार्थी, शिक्षक आणि युवक सहभागी होणार आहेत. कार्यक्रमाद्वारे वसंत देसाई यांच्या कालातीत चाली आणि गीतांवर श्रद्धांजली वाहण्यात येईल.
वसंत देसाई यांचा संगीताचा वारसा
‘घन:श्याम सुंदरा’, ‘उठी उठी गोपाळा’, ‘हमको मन की शक्ति देना’, ‘ऐ मालिक तेरे बंदे हम’ यांसारखी अनेक गीते आजही रसिकांच्या हृदयावर राज्य करतात. जगभरातील कोट्यवधी संगीतप्रेमींच्या मनावर आपल्या चालींनी गारुड करणारे वसंत देसाई यांचे २२ डिसेंबर १९७५ रोजी मुंबईतील एका दुर्दैवी लिफ्ट अपघातात निधन झाले होते.
पन्नासाव्या स्मृतीदिनाची तयारी सुरू
पुढील वर्षी वसंत देसाई यांचा पन्नासावा स्मृतीदिन भव्य स्वरूपात साजरा करण्यात येणार आहे. या निमित्ताने हजारो विद्यार्थी ‘एक सूर, एक ताल’ या संकल्पनेतून त्यांना स्वरांजली अर्पण करणार असल्याची माहिती संगीतकार सोमनाथ परब यांनी दिली.