नागपूर – विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी शिवसेना (उद्धव ठाकरे) गटाचे सदस्य भास्कर जाधव यांनी सरकारवर तीव्र हल्ला चढवत जोरदार टोलेबाजी केली. “विदर्भात अधिवेशन होत असूनही जनतेला विश्वास वाटेल असे काहीच घडत नाही. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा विक्रम या सरकारच्या काळात झाला आहे. राज्याला घटनात्मकदृष्ट्या एकच मंत्री आहे – ते मुख्यमंत्री. बाकीचे मंत्री बिनखात्याचे असून, सुविधा घेत आहेत आणि त्यांच्या आनंदात सहभागी आहेत. ‘राम तेरी गंगा मैली’ असे म्हणायची वेळ आली आहे का?” असा घणाघात जाधव यांनी विधानसभेत केला.
शेतकरी आत्महत्यांवरून सरकारला धारेवर
भास्कर जाधव यांनी विरोधी पक्षांच्या अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेची सुरुवात करत राज्यातील शेतकरी आत्महत्यांचा मुद्दा उपस्थित केला. “१ जानेवारी २०२४ पासून नोव्हेंबरपर्यंत २,३३५ आत्महत्या झाल्या. महाराष्ट्राने आत्महत्यांचा विक्रम केला आहे. दूध उत्पादकांना दर पडले असून केवळ कागदावर घोषणा होत आहेत. प्रत्यक्षात एमएसपी कुठे आहे?” असा सवाल करत त्यांनी सरकारला घेरले.
पीक विमा योजनेतील भ्रष्टाचारावर टीका
पीक विमा योजनेत हजारो कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाला असून, हा भ्रष्टाचार शासकीय यंत्रणांच्या मदतीने मंत्र्यांच्या आशीर्वादाने चालतो, असा गंभीर आरोपही जाधव यांनी केला. अनेक गुन्ह्यांवर पांघरूण घातले जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
उद्योग आणि रोजगाराबाबत सरकारवर टीका
“विदर्भ आणि मराठवाड्यात उद्योग आणण्याच्या घोषणा सरकारने केल्या, पण उदासीनतेमुळे राज्यातील अनेक उद्योग बाहेर गेले. महाराष्ट्र देशात तेराव्या क्रमांकावर घसरला आहे. नमो रोजगार योजनेत किती लोकांना रोजगार मिळाला? दावोस येथे १.५० लाख कोटींचे करार झाले, त्यापैकी किती प्रत्यक्षात सुरू झाले?” असा सवाल जाधव यांनी केला.
ते पुढे म्हणाले, “रत्नागिरी जिल्ह्यातील एमआयडीसी का रद्द झाली? विकासाचा गळा घोटू नका,” असे आवाहनही त्यांनी सरकारला केले.
औषध पुरवठ्यातील बनावट रॅकेट आणि चौकशीची मागणी
शासकीय रुग्णालये आणि दवाखान्यांत बनावट औषध पुरवठा होत असल्याचा आरोप करत जाधव यांनी राज्याबाहेरील नोंदणी नसलेल्या पाच कंपन्यांमार्फत रॅकेट चालवले जात असल्याची माहिती दिली. या प्रकरणाची तातडीने चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली.
वसाहतीतील मराठी कर्मचाऱ्यांच्या घरांसाठी स्थगितीची मागणी
मुंबईतील वांद्रे येथील शासकीय वसाहतीत राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना घरे रिक्त करण्याच्या नोटिसा देण्यात आल्या आहेत. या नोटिसांवर स्थगिती देण्याची मागणी करत जाधव म्हणाले, “ही सर्व मराठी माणसे आहेत. सरकारने त्यांची दखल घेतली पाहिजे.”